• Thu. Jun 19th, 2025

आयएमएच्या महिला विंगच्या वतीने जिल्ह्यात  विविध ठिकाणी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा

Byjantaadmin

Aug 8, 2023

आयएमएच्या महिला विंगच्या वतीने जिल्ह्यात  विविध ठिकाणी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
लातूर : इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात आयएमएच्या महिला विंग तसेच शासकीय आरोग्य यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आल्याची माहिती आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा तथा आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालिका डॉ. सौ. प्रिती बादाडे यांनी दिली.
दि. १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट हा कालावधी जागतिक पातळीवर जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या कालावधीत ग्रामीण भागातील गर्भवती माता, स्तनदा माता तसेच माता पालकांना स्तनपानाचे महत्व विशद करून स्तनपानाचे माता व बाळाच्या आरोग्यासाठी असणारे फायदे सांगितले गेले. आयएमएच्या महिला विंग व शासकीय आरोग्य यंत्रणेच्या संयुक्त विद्यमाने उदगीर येथील सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र भातांगळी, बाभळगाव ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय लातूर, लातूरच्या एमआयटी एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयातील बालरोग विभाग यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात आयएमए महिला विंगच्या अध्यक्षा तथा आरोग्य विभागाच्या सहाय्यक संचालिका डॉ. सौ. प्रिती बादाडे, सचिव डॉ. प्रियंका राठोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढेले , डॉ.अनिल सोनवणे , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अर्चना पंडगे, उदगीरच्या सामान्य रुग्णालयाच्या डॉ. मोनिका पाटील, किल्लारी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सुजाता मुगळे पाटील, ग्रामीण रुग्णालय, बाभळगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. सारिका देशमुख, एमआयटीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. माले , वैद्यकीय अधिकारी डॉ. सगिरा पठाण, डॉ. राजश्री कलमे, डॉ. क्रांती कापसे,डॉ. जमादार, डॉ. शिरोळे , डॉ. सरिता मंत्री, डॉ. विद्या कांदे, डॉ. शैला सोमाणी, डॉ. प्रतिभा केंद्रे डॉ. संजीवनी तांदळे , डॉ. शीतल शेळके ,डॉ. कल्पना जाजू, डॉ. शीतल बाहेती, डॉ. शिल्पा दडगे, डॉ. मंगेश डाके,डॉ. शीतल भट्टड, डॉ. दीपिका भोसले आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमांना संबोधित करताना डॉ. प्रिती बादाडे यांनी मातांनी आपल्या बालकांना स्तनपान करणे किती अगत्याचे व शारीरिक दृष्ट्या महत्वपूर्ण असल्याचे सांगितले. मातांनी आपल्या बालकांना स्तनपान केल्याने माता व बालक या दोघांचेही स्वास्थ सुदृढ राहते, स्तनपानामुळे महिला स्तनाच्या कर्करोगासारख्या असाध्य व्याधींपासून स्वतःचे संरक्षण करू शकतात. त्यामुळे स्तनपान ही निसर्गाने महिलांना त्यांच्या व बालकांच्या आरोग्यासाठी दिलेली एक अनमोल भेट असल्याचे डॉ. बादाडे यांनी सांगितले. आता तर लहान बालके असणाऱ्या मातांसाठी नोकरीच्या ठिकाणीही स्तनपान करण्यासाठी हिरकणी कक्षाची निर्मिती केली जात असल्याचे त्या म्हणाल्या. कामामुळे माता आपल्या बाळाला स्तनपानापासून वंचित ठेवू नये यासाठी ही विशेष काळजी घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. सगिरा पठाण , डॉ. प्रियंका राठोड यांनीही माता पालकांना स्तनपानाचे महत्व विशद करून कोणत्याही स्तनदा मातेने आपले बालक स्तनपानापासून वंचित राहू नये याची पुरेपूर काळजी घ्यावी असे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *