आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलिस निरीक्षकास घातला घेराव
निलंगा : (प्रतिनिधी)निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील एकाचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला. मात्र हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप करीत मृताच्या नातेवाईकानी पोलिस ठाण्यासमोर दगडे टाकून तब्बल अडीच तास मुख्य रस्ताच ठिय्या करून अडवला. यावेळी पोलिस निरीक्षकांना घेराव घालत जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतल्याने पोलिसही झाल्या प्रकाराबद्दल हतबल होऊन पाहत होते. भर रस्त्यावर दगडे टाकून रस्ता अडवल्याने शहरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती .
निलंगा तालुक्यातील लांबोटा येथील अतुल वसंतराव तुरे वय ३२ वर्षे हा संध्याकाळी निलंगा येथून गावाकडे जात असताना साडे दहाच्या सुमारास लातूर-जहीराबाद महामार्गावर केडीया दाळ मिलच्या समोर दोन मोटारसायकलमध्ये समोरासमोर धडक लागल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाल् याने अतुल तुरे याचा मृत्यू झाला. पोलिस ठाणे निलंगा येथे अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. मात्र हा अपघात नसून गावातीलच व्यक्तीने घातपात केला असून दोन्ही मोटारसायकलचे कोठेही नुकसान झाले नाही असा आरोप करत मृताच्या नातेवाईकानी संबंधित व्याक्ती विरोधात खून केल्याचा गुन्हा दाखल करावा म्हणून निलंगा शहरातील पोलिस ठाण्याजवळच रस्त्यावर भर दगडे टाकून पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांना घेराव घालून तब्बल आडीच तास मुख्य रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मात्र गुन्हा दाखल करून संबंधिताला अटक केल्याशिवाय आम्ही प्रेत ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक संताप व रोष व्यक्त करीत ठाम होते. शिवाय मृताचे नातेवाईक कारवाई करा म्हणून ठाम राहत पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडले होते.