मनोहर उर्फ संभाजी भिंडे यांनी महात्मा गांधी, महात्मा ज्योतीबा फुले, साईबाबांसह इतर महापुरुषांच्या विरोधात वादग्रस्त विधाने केली. त्यांच्या विधानांमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. त्यांच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, मात्र सरकार त्यांना अटक करायला तयार नाही. सरकारला त्यांच्या माध्यमातून राज्यात दगंली घडवायच्या आहेत का ? असा सवाल काॅंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.
यांच्यावर कारवाईची मागणी करत विरोधकांनी आज सभागृहात सरकारला जाब विचारला. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात या मुद्यावरून जोरदार खडाजंगी झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांनाअशोक चव्हाण यांनी संताप व्यक्त केला. अशोक चव्हाण म्हणाले, मनोहर भिडे पोलीस संरक्षणात एकापाठोपाठ वादग्रस्त विधाने करून महापुरूषांचा, साईबाबांचा व देशाचा अवमान करत आहेत.सामाजिक- धार्मिक भावना दुखावत आहेत, राज्यात आग लावण्याचा प्रयत्न सुरू आहे.तरीही त्यांच्याविरूद्ध प्रतिबंधात्मक कारवाई का होत नाही? मनोहर भिडे यांनी अमरावती, यवतमाळ, पिंपरी-चिंचवड अशा अनेक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. आज विरोधी पक्षांनी याबाबत विधानसभेत दाद मागण्याचा प्रयत्न केला. पण विरोधकांना बोलण्याची पुरेशी संधी दिली गेली नाही.पोलिसांनी गुन्हे दाखल केले. पण त्यानंतर त्यांच्यावर कोणतीही प्रतिबंधात्मक कारवाई झाली नाही. ते अजूनही मोकाट फिरत आहेत आणि भाषणे देत आहेत. त्यांच्या माध्यमातून सामाजिक वाद निर्माण करायचे, दंगली घडवायच्या आणि त्याचा राजकीय फायदा मिळवायचा, हे राज्य सरकारचे धोरण आहे का ? असा सवाल देखील चव्हाण यांनी यावेळी केला.