• Tue. Apr 29th, 2025

असेल तिथून उचलून भिडे यांना कोठडीत टाका; विजय वडेट्टीवार आक्रमक

Byjantaadmin

Aug 2, 2023

मुंबई | 2 ऑगस्ट 2023 : शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे ऊर्फ मनोहर कुलकर्णी यांनी महात्मा गांधी, महात्मा फुले आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल अपशब्द वापरले आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली आहे. अनेक ठिकाणी भिडे यांच्याविरोधात जोरदार निदर्शने केली जात आहेत. अनेक ठिकाणी भिडे यांच्या पुतळ्याला जोडे मारले जात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि आंबेडकरी संघटनांनी हे आंदोलन सुरू केलं आहे. भिडे यांना अटक करण्याची मागणी होत आहे. काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेतच संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. तर काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तर भिडे यांना असेल तिथून उचलून अटक केली पाहिजे, अशी मागणी केली आहे.विजय वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही मागणी केली. संभाजी भिडे हा राष्ट्रद्रोही माणूस आहे. त्यांनी राष्ट्रध्वजाचा अपमान केला आहे. ज्योतिबा फुले यांच्या संदर्भात या माणसाने गलिच्छ शब्दात वक्तव्य केले आहेत. त्यामुळे भिडे यांना असेल तिथून उचलून कोठडीत टाकलं पाहिजे, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

साईबाबांचाही अपमान

जिथे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साईबाबांच्या चरणी नतमस्तक झाले. त्या साईबाबांचा अपमान या पापगुरू माणसाने केलेला आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी असा आपमन सहन करणार नाही अशी भूमिका मांडली होती. आता यांना तुरुंगात कधी टाकणार असा माझा प्रश्न आहे. नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने आंदोलन करू, असा इशारा त्यांनी दिला.

भाजपला पोषक

टोपणनाव घालून मराठी पोरांना भुरळ घालण्याचा प्रयत्न संभाजी भिडे करत आहे. सत्ताधारी भाजपला फायदा व्हावा, समजतं तेढ निर्माण व्हावी हे त्यांचं उद्दिष्ट असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. यांचं मूळ कितीही नाकारलं तरी भाजपला पोषक आहे, असा दावाही त्यांनी केला. भिडे यांच्या अनेक व्हिडीओ क्लिप्स आलेल्या आहेत. त्यात त्यांनी जाहीर वक्तव्य केलेलं दिसत आहे. त्यातून वेळकाढूपणा करून नालायक माणसाला मोकाट करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांचा आहे, असंही ते म्हणाले.

रणनीती ठरवायची आहे

आज महाविकास आघाडीची बैठक होणार आहे. इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होणार आहे. त्याची तयारी करण्यासाठी ही बैठक होत आहे. त्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या बैठकीत आम्हाला पुढची रणनीती ठरवायची आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न

विरोधी पक्षनेता ठरवल्यानंतर काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार आहे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर अशी कोणतीही चर्चा नाही, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी रोहिणी आयोगालाही विरोध केला. सरकारची भूमिका आरक्षण विरोधी आहे. कुठल्याही प्रकारचं आरक्षण द्यायचं नाही. हक्क हिरावून घेण्याचं काम सरकार करतंय. रोहिणी आयोग म्हणजे ओबीसी समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न आहे, असा दावाही त्यांनी केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed