• Wed. Apr 30th, 2025

50 खोक्यांचा आरोप करणाऱ्यांवर मानहानीचा दावा ठोकणार, शिंदे गटाचा इशारा

Byjantaadmin

Nov 9, 2022

राज्याच्या राजकारणात 50 खोक्यात सुरु झालेला वाद आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. खोक्यांचा आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस देण्याचा इशारा शिंदे गटानं दिलाय. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि आदित्य ठाकरेंवर मानहानीचा दावा ठोकू असं शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी सांगितलं आहे.

शिवसेनेतील बंडानंतर 50 खोके, एकदम ओके अशी घोषणाबाजी विधिमंडळ पायऱ्यांवरच्या आंदोलनात झाली आणि पुढे त्यावरून शिंदे गटाच्या आमदारांना टीकेचं लक्ष्य करण्यात आलं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या शिर्डीच्या अधिवेशनात खोक्यांवर टीका केली आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवराळ भाषेत उत्तर दिलं. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण पुन्हा तापलं. त्यानंतर शिंदे गटानं आता कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली व प्रसिद्ध झाली!

एकनाथ शिंदे चाळीस आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वादासाठी आम्ही बाहेर पडलो. ही तत्त्वांची लढाई आहे असं शिंदे यांनी सांगितलं. पण महाविकास आघाडीतील नेत्यांनी याला तत्वांची नाही तर खोक्यांची लढाई करुन टाकली. गेल्या काही दिवसात 50 खोके एकदम ओके ही घोषणा राज्यभर पोहोचली.  राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार येऊन चार महिने झाले आहेत. मात्र ही घोषणा काय आजही टीका करताना दिली जाते.

बच्चू कडू, रवी राणा यांच्या पुरताच 50 खोक्याचा वाद रंगला असं नाही. तर गेल्या अधिवेशनात थेट विधिमंडळाच्या पायऱ्यावरही 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा दुमदुमल्या होत्या. राज्याच्या इतिहासात कधी झाला नसेल एवढा गदारोळ 50 खोक्यांवरुन विधिमंडळाच्या पायऱ्यावर बघायला मिळाला. शिंदे गट आणि महाविकास आघाडीचे आमदार यावरुनच एकमेकांना भिडले देखील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed