आधी मेकॅनिक मग शेतकरी यांची भेट घेतल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आज पहाटे दिल्लीतील आझादपूर मंडईत पोहोचले. इथे त्यांनी भाजी विक्रेते, व्यापारी आणि इतर लोकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधला. तसंच भाज्यांच्या दरांबाबत ग्राहकांसोबत चर्चा देखील केली.राहुल गांधी भाजी मार्केटमध्ये पोहोचताच तिथे लोकांची गर्दी जमा झाली. पीटीआय या वृत्तसंस्थेने ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात राहुल गांधी हे भाजी मंडईत विक्रेत्यांसोबत संवाद करताना, चर्चा करताना दिसत आहेत.
आझादपुरी मंडईतील विक्रेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नुकताच आझादपूर मंडईमधला एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. आठ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये रामेश्वर नावाचा इसम रिकामी हातगाडी घेऊन उभा आहे. रिपोर्टर त्याला विचारतो की तू पहाटे टोमॅटो घेण्यासाठी आला होतास? त्यावर रामेश्वर म्हणतो हो, मी टोमॅटो घ्यायला आलो होतो, पण भाव पाहून धीर होत नाही. टोमॅटो महाग होत आहेत, म्हणून घेत नाही. 120-140 रुपये दराने टोमॅटो मिळत आहे. यामुळे आमचे नुकसान होईल. मग रिपोर्टर विचारतो की हातगाडी अशीच रिकामी राहिली, टोमॅटोशिवाय दुसरं काही तरी भरणार की नाही? यानंतर शांतता पसरते… प्रत्येक सेकंदाचा आवाज ऐकू येतो, एवढी शांतता. यानंतर रामेश्वर शांतपणे आजूबाजूला पाहतो आणि नजर झुकवून डोळे पुसतो. मग शांत होऊन तो सांगतो की, तो जहांगीर पुरी इथे भाड्याने राहतो, 4000 रुपये भाडे आहे. रिपोर्टर विचारतो, कमाई किती आहे? त्यावर रामेश्वर सांगतो रोज 100 रुपये देखील कमाई होत नाही. एवढं बोलल्यावर पुन्हा एकदा शांतता पसरते. यानंतर रामेश्वर महागाईवर आणखी बरंच काही बोलतो, त्यानंतर तो रिकामी हातगाडी घेऊन बाजारातून निघताना निघतो.
देशाची दोन वर्गात विभागणी : राहुल गांधी
राहुल गांधी यांनी 28 जुलै रोजी ट्विटरवर या विक्रेत्याचा व्हायरल व्हिडीओ शेअर केला होता. देशाची दोन वर्गात विभागणी होत आहे, असंही त्यांनी लिहिलं होतं. “एकीकडे सत्तेचे संरक्षण करणारे शक्तिशाली लोक आहेत, ज्यांच्या सांगण्यावरुन देशाची धोरणं बनवली जात आहेत आणि दुसरीकडे एक सामान्य भारतीय आहे, भाजीपाल्यासारख्या मूलभूत गोष्टीही ज्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील ही वाढती दरी आपल्याला भरुन काढायची आहे आणि हे अश्रू पुसायचे आहेत,” असंही त्यांनी म्हटलं होतं.
VIDEO | Congress leader Rahul Gandhi met vegetable and fruit vendors at Delhi's Azadpur Mandi earlier today.
(Source: Third Party) pic.twitter.com/eSNgpk4nEE
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2023
शेतकरी आणि मेकॅनिकसोबत गप्पा
दरम्यान राहुल गांधी याआधी हरियाणातील सोनीपतमध्ये शेतकऱ्यांना भेटले होते. इथे त्यांनी शेतात काम केलं होतं. राहुल गांधी यांनी स्वत:च्या ट्विटर हँडलवरुन फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ते शेतात काम करताना, ट्रॅक्टर चालवताना, शेतकऱ्यांशी बोलताना आणि त्यांच्यासोबत जेवण करताना दिसत आहेत. तर त्याआधी दिल्लीतील करोलबागमध्ये मोटार मेकॅनिकसोबतचे त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओही समोर आले होते. यावेळी ते वाहन दुरुस्त करताना, मेकॅनिकशी बोलताना दिसत आहे. आपल्याकडे केटीएम बाईक आहे, परंतु सुरक्षा रक्षकांमुळे ती दुचाकी चालवत येत नाही, असं राहुल गांधी यांनी सांगितलं होतं.