• Tue. Jun 10th, 2025

निलंगा तालुका एकसंघ राहण्यासाठी व्यापारी संघाची बैठक संपन्न

Byjantaadmin

Jul 31, 2023
निलंगा तालुका एकसंघ राहण्यासाठी व्यापारी संघाची बैठक संपन्न
निलंगा/प्रतिनिधी  निलंगा तालुका एकसंघ राहण्यासाठी शहरातील शेकडो व्यापारी संघटनेने बैठक घेऊन आपल्या व्यथा मांडल्या व आमदार निलंगेकर यांना तालुका एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करावे अशी  मागणी केली आहे….
निलंगा तालुक्यातील ६८ गावे हे कासार शिरसी येथे नविन होत असलेल्या अप्पर तहसिलला जोडले जात असल्याने तालुक्याशी आर्थिक व भौगोलिक व्यापारी दृष्ट्या जोडलेली गावे तुटली तर शहरातील व्यापाराला याचा मोठा फटका बसू शकतो आणि आमचे छोटे मोठे व्यापार देशोधडीला लागतील आमच्यावर उपासमारीची वेळ येईल कोरोना या महामारीमुळे गेल्या तीन वर्षापासून आम्ही व्यापारी गारद झालो आहोत,अनेक बँकांचे कर्ज काढून आम्ही व्यापार करत आहोत,आणि यातच आमच्या व्यापाराशी जोडलेली ६८ गावची नाळ तोडली तर निलंगा शहरातील व्यापाराला याचा मोठा फटका बसणार आहे.म्हणत शहरातील एकून ४० व्यापारी संघटनानी भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांना  बैठकीला बोलावून त्यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या व माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी तात्काळ लक्ष घालून निलंगा तालुक्यातील ६८ गावे कासार शिरसी येथील अप्पर तहसिलला जोडू न देता कायम तालुक्यात ठेवावी अशी मागणी सदरील बैठकीत केली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून हा निलंगा तालुका राजकीय व भौगोलिक दृष्ट्या एकसंघ आहे.कासार शिरसीच्या विकासाला आमचा विरोध नाही.त्या भागाचा विकासच करायचा असेल तर कासार शिरसी येथे नगर पंचायत मंजूर करावी तेथे अनेक उद्योग आणावे व त्या भागाचा सर्वागीण विकास करावा.राजकीय व्देषापोटी किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी निलंगा तालुक्याचे तुकडे करणे हे आम्हाला मान्य नाही.निलंगा तालुका हा अनेक वर्षापासून एकसंघ आहे.एकसंघ राहू द्या अशी आर्त हाक शहरातील शेकडो व्यापाऱ्यांची या बैठकीत दिसून आली.
या बैठकीला व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद बाहेती,मेडिकल संघटनेचे सोमनाथ आग्रे,भांडी दुकान संघटनेचे रत्नदिप बेडगे,मराठा सेवा संघाचे विनोद सोनवणे,वकील संघटनेचे अॕड.जयंत  देशपांडे,अॕड.प्रसाद जवळगेकर,कृषी फर्टीलायर्झचे मारूती शिंदे,खाजगी वैद्यकिय संघटनेचे डॉ.लालासाहेब देशमुख,संघनक व झेराॕक्स दुकान संघटनेचे जयदेव अनवले,इलेक्ट्रिशन संघटनेचे विष्णू मोहिते,किराणा दुकान संघटना व्यापारी श्रीकांत तोष्णीवाल,फळगाडे व्यापारी मुस्लिम समाज संघटना तर्फे नशीम खतीब,भाजीपाला माळी महासंघाचे युवक प्रदेश अध्यक्ष शरद पेठकर,यांच्यासह शहरातील सर्वच व्यापारी प्रतिनिधी संघटना यानी आपल्या व्यथा व मते व्यक्त केली व तालुका एकसंघ ठेवण्यासाठी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर याना मागणी केली आहे.
शहरातील जिजाऊ सृष्टी येथे दिनांक ३० रोजी ४ वाजता  चाळीस व्यापारी संघटनानी ही बैठक आयोजित केली होती.या बैठकीचे प्रास्तविक शेषराव ममाळे यानी केले तर आभार व्यापारी इरफान सय्यद यानी मानले.
तालुका एकसंघ ठेवण्यासाठी आपण सारे निलंगेकर या नात्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंञी देवेंद्र फडणविस,उपमुख्यमंञी अजित पवार यांच्या समोर शहरातील व्यापाऱ्यांच्या व्यथा मांडणार असून तुमची मागणी ही रास्त आहे.६८ गावचा मोठा फटका व्यापारी, कामगार,शेतकरी,कष्टकरी याना बसणार आहे.तालुक्याचे तुकडे न करता लोकांच्या जनभावनेचा विचार करून निर्णय घ्यावे त्यांच्यावर अचानक निर्णय लादून नुकसान करू नये राजकीय पुढाऱ्यांनी जनभावनेचा आदर करावा असे मत व्यक्त करत यावर तात्काळ निलंगा विधानसभा मतदार संघाचे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लक्ष घालून तोडगा काढतील असा तुम्हाला शब्द देतो असे भाजपा युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी उपस्थित व्यापाऱ्यांना शब्द दिला….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *