मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार व अनन्वित अत्याचार केल्याच्या घटनेनं देशभरात खळबळ उडाली असतानाच आता आणखी एक हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यातील हिंसाचारादरम्यान आणखी ५ महिलांवर अत्याचार झाल्याचा दावा खुद्द मणिपूरच्या दहा आमदारांनी केला आहे. या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.मणिपूरमध्ये मागच्या अडीच महिन्यांपासून हिंसाचार सुरू आहे. या कालावधीत दोन महिलांवर अत्याचार झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं तणाव प्रचंड वाढला आहे. देशभरात संतापाची लाट उसळली आहे. गुन्हेगारांवर कारवाईची मागणी करतानाच विरोधकांनी केंद्र व राज्य सरकारवरही टीकेची झोड उठवली आहे. अशातच आणखी ५ महिलांसोबत अशाच घटना घडल्याचा दावा तेथील १० आमदारांनी केला आहे. त्यांनी तसं निवेदनच काढलं आहे. यातील तीन महिलांवर वेगवेगळ्या वेळी बलात्कार झाल्याचंही म्हटलं आहे.
आमदार लालियांग मंग खौटे, लेटपाओ हाओकीप यांनी यास दुजोरा दिला आहे. ‘आमच्याकडे अशा घटनांचे व्हिडिओ नाहीत. मात्र गेल्या दोन महिन्यांत राज्यात अशा घटना घडल्या आहेत. याबाबत आम्ही पीडितांच्या कुटुंबीयांशी बोललो आहोत आणि त्या आधारे निवेदन जारी केलं आहे. या प्रकरणांचा तपास सीबीआयमार्फत करावा, अशी मागणी आमदारांनी सरकारकडं केली आहे. पोलिसांकडून मात्र अद्याप यास दुजोरा देण्यात आलेला नाही.
आरोपीचं घर जमावानं पेटवलं!
मणिपूरमधील महिला अत्याचाराचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्य व केंद्र सरकार खडबडून जागं झालं आहे. आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अफवा पसरू नयेत म्हणून राज्यात इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर केंद्र सरकारनं कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अत्याचाराचे व्हिडिओ शेअर करण्यावर बंदी घातली आहे.