• Tue. Apr 29th, 2025

सर्वांगिण  प्रगतीसाठी सकल  जंगम समाजाने संघटित होणे  काळाची गरज आहे : खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज 

Byjantaadmin

Nov 7, 2022
सकल जंगम समाज वधू – वर परिचय मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
सर्वांगिण  प्रगतीसाठी सकल  जंगम समाजाने संघटित होणे
 काळाची गरज आहे : खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज
लातूर : सर्वांगिण प्रगतीसाठी सकल  जंगम समाजाने यापुढील काळात जराही वेळ न दवडता संघटित होणे ही काळाची गरज आहे. त्याशिवाय आपला समाज प्रगतीपथावर जाऊ शकणार नाही, असे प्रतिपादन सोलापूरचे खासदार  ष . ब्र . १०८   डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यांनी केले.
             लातूर येथे रविवार, दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी औसा रोडवरील बिडवे लॉन्स, भागीरथी मंगल कार्यालयात सकल जंगम समाज वधू – वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.  या मेळाव्याचे उद्घाटक म्हणून  ष . ब्र . १०८ खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज सोलापूर, ष . ब्र . १०८ निरंजन शिवाचार्य महाराज हिरेमठ संस्थान औसा यांची उपस्थिती होती. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी  प्रमुख पाहुणे म्हणून  बाळासाहेबांची शिवसेनाचे  जिल्हा प्रमुख ज्येष्ठ विधिज्ञ बळवंत जाधव, उस्मानाबादचे उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी,  नागपूरचे जीएसटीचे सहायक आनंद स्वामी,  राष्ट्रीय महामार्ग विभाग लातूरचे कार्यकारी अभियंता गौरीशंकर स्वामी,  राजशेखर बिडवे, वधू वर परिचय मेळाव्याचे माजी अध्यक्ष विजयकुमार स्वामी हुंडेकरी,  बंडाप्पाण्णा काळगे , षण्मुखानंद स्वामी उदगीर ,  सूर्यकांतअण्णा पत्रे निलंगा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराज यावेळी बोलताना पुढे म्हणाले की,  कोणत्याही समाजाची सर्वांगिण , सर्वंकष प्रगती समाज एकत्रित आला, संघटित राहिला तरच होत असते. अशा प्रकारच्या वधू – वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून विविध स्तरातील समाज बांधव एकत्रित येऊन संघटित होत आहेत, ही बाब अत्यंत समाधानाची आहे. लातूर येथे जंगम भवनच्या नियोजित वास्तूच्या उभारणीसाठी  मेळाव्याचे अध्यक्ष त्र्यंबक स्वामी व त्यांचे सहकारी त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. लातूरच्या जंगम भवनसाठी निःशुल्क  जागा उपलब्ध करून देण्याची तयारीही समाज बांधवाने  दर्शवली असल्याचे समजले. ही बाब समाजासाठी अत्यंत चांगली असून उदगीर सोबतच लवकरच लातूरच्या जंगम भवन उभारणीचा पायाभरणी समारंभ पूर्ण करावा, या कार्यक्रमास आपण स्वतः आवर्जून उपस्थित राहू, असे डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य म्हणाले.  तसेच प्रत्येकाने  आयुष्यात मातृ – पितृ , आचार्य, समाज आणि देश असे पाच प्रकारचे ऋण  फेडणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपले उचित योगदान देण्याची तयारी ठेवलीच पाहिजे. केंद्रात आणि राज्यात एकाच विचाराने चालणारे सरकार आहे. आपण येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन लातूरच्या जंगम भवनला दोन कोटी रुपयांचे सहाय्य  मंजूर करून घेतो,असेही त्यांनी नमूद केले. जंगम समाजातील सर्वच स्तरातील नागरिकांनीही जंगम भवनच्या उभारणीसाठी आपला खारीचा वाटा देण्याची तयारी ठेवावी,असे आवाहनही डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महाराजांनी केले. निरंजन शिवाचार्य महाराजांनीही या उपक्रमास आपल्या शुभेच्छा दिल्या. अशा प्रकारच्या उपक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. ज्येष्ठ विधिज्ञ बळवंत जाधव यांनी आपल्या मनोगतात त्र्यंबक स्वामी यांनी जंगम भवनसाठी राज्य सरकारकडून जी मदतीची अपेक्षा केली आहे, तिच्या पूर्ततेसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू असे सांगितले. समाजाने जंगम भवनसाठी जागा उपलब्ध करावी, बाकीचे सहकार्य आपण करू असेही ते म्हणाले. मेळाव्याच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांनी सर्व संयोजकांचे अभिनंदन केले.
सकल  जंगम समाज वधू  वर परिचय मेळाव्याचे अध्यक्ष त्र्यंबक स्वामी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वधू वर परिचय मेळाव्याचे आयोज ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. त्याचबरोबर उदगीरच्या धर्तीवर लातूर येथेही जंगम भवनची उभारणी करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत. त्यासाठी  जमीन उपलब्ध करून देण्याची  तयारी  आहे. आता शासन स्तरावरून भरघोस मदतीची अपेक्षा आहे. या जंगम भवनसाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणीही स्वामी यांनी खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्याकडे केली. मेळाव्याचे स्वागताध्यक्ष शिवप्रसाद स्वामी यांनी स्वागतपर विचार व्यक्त केले. मेळाव्याचे सचिव हावगी स्वामी यांनी प्रास्तविक केले. प्रास्तविकात त्यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका थोडक्यात विशद केली.  याप्रसंगी व्यासपीठावरील मान्यवरांसह चंद्रकांत मठपती, विलास स्वामी गुरुजी, श्रीधर स्वामी, सूर्यकांत पत्रे यासह समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शिवकांत स्वामी गुरुजी व   कुमारस्वामी गणाचार्य यांनी केले तर आभार प्रदर्शन मन्मथ स्वामी बाभळगावकर यांनी केले. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह समाज बांधवानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed