लाच मागणा-या तहसीलच्या महिला क्लार्कवर गुन्हा दाखल
उस्मानाबाद : शेतरस्त्याच्या अंतिम निकालावर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन निकालाची प्रत देण्यासाठी शेतक-याला १० हजार रूपयांची लाच मागणा-या महिला महसूल सहाय्यकवर (क्लार्क) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वाती ज्योतीराम खताळ असे त्यांचे नाव आहे. एसीबीने सापळा लावल्याचा संशय आल्याने लाच मागितली पण स्विकारली नव्हती. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १८ जुलै रोजी धाराशिव शहरात केली. लाच मागणा-या स्वाती खताळ यांचा प्रवास शिपाई ते महसूल सहाय्यक असा आहे.उस्मानाबाद तालुक्यातील एका गावातील शेतक-यांनी तहसील कार्यालयात शेतरस्ता मिळावा, म्हणून प्रकरण दाखल केले होते. प्रकरण चालल्यानंतर अंतिम निकाल देण्यात येणार होता. या निकालावर तहसीलदारांची स्वाक्षरी घेऊन निकालाची प्रत देण्यासाठी महसूल सहाय्यक स्वाती ज्योतीराम खताळ यांनी तक्रारदार शेतक-याकडे १० हजार रूपये लाचेची मागणी केली होती. २१ जून, २६ जून व १७ जुलै रोजी लाचमागणी पडताळणी करण्यात आली. एसीबीच्या पथकाने सापळा लावल्याचा संशय आल्याने स्वाती खताळ यांनी लाच मागितली पण स्विकारली नाही. या प्रकरणी महसूल सहाय्यक स्वाती खताळ यांच्या विरोधात लाच मागितल्या प्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात १८ जुलै रोजी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई एसीबीचे पोलीस निरिक्षक, सापळा अधिकारी विकास राठोड यांनी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली केली. सापळा पथकामध्ये पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विशाल डोके, विष्णू बेळे, सचिन शेवाळे यांचा समावेश होता.
मॅडमचा शिपाई ते क्लार्क प्रवास
स्वाती खताळ या २०१० मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून रूजू झाल्या होत्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागात त्यांनी शिपाई म्हणून काही वर्षे काम केले. त्यांची पदोन्नती महसूल सहाय्यक म्हणून झाल्यानंतर त्या धाराशिव तहसील कार्यालयात रूजू झाल्या. त्यांच्याकडे शेतरस्ते सुनावण्या संदर्भात कामकाज होते. शेतक-याकडून लाच घेण्याच्या कारणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.