निलंगा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी पुरवणी अर्थसंकल्पात 38 कोटी 68 लाखाची तरतुद
लातूर/प्रतिनिधीः- माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सातत्याने निलंगा मतदारसंघातंर्गत असलेल्या निलंगा,देवणी व शिरुर अनंतपाळ तालुक्यातील विकास कामांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरु ठेवलेला आहे. राज्य सरकारचा नुकताच पुरवणी अर्थसंकल्प जाहीर झालेला असून या अर्थसंकल्पात निलंगा मतदारसंघातील विविध 13 विकास कामांसाठी 38 कोटी 68 लाख रूपयांच्या निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. या माध्यमातून मतदारसंघात रस्ते, पुल व सरकारी कार्यालय आणि निवासस्थाने उभारली जाणार आहेत.
राज्य सरकारच्या वतीने नुकताच पुरवणी अर्थसंकल्प जाहीर झालेला आहे. या अर्थसंकल्पात निलंगा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. यामध्ये निलंगा तालुक्यातील निलंगा-अनसरवाडा- सोनखेड- सावरी या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणीकरण करण्यासाठी 14 कोटी रूपयांच्या निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. शिरुर अंनतपाळ तालुक्यातील बिबराळ ते साकोळ या रस्त्यावरील घरणी नदीवर दोन पुलांचे बांधकाम करण्यासाठी 5 कोटी रूपये तर देवणी तालुक्यातील शेकापूर-तळेगाव व दवण हिप्परगा- बोळेगाव या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणीकरण करण्यासाठी 2 कोटी 20 लाखाची तरतुद करण्यात आलेली आहे. शिरुर अनंतपाळ तालुक्यातील मुशीराबाद-शिरुर अनंतपाळ- तळेगाव या रस्त्यावरील पुलासाठी 2 कोटी 98 लाख रूपयांची तरतुद करण्यात आलेली आहे. निलंगाता तालुक्यातील अनसरवाडा-सोनखेड-सावरी व तगरखेडा-हालसी या रस्त्यावरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी 2 कोटी 45 लाख रूपयांची तरतुद झालेली आहे. देवणी तालुक्यातील देवणी- बोरोळ ते राज्याच्या सिमेपर्यंत असलेल्या रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणीकरण करण्यासाठी 2 कोटी रूपय तर शिरुर अनंतपाळ तालुक्यातील सुगाव-हिप्पळगाव-थेरगाव व दैठणा- देवर्जन-शेकापूर यारस्त्याच्या सुधारणीकरण करण्यासाठी 1 कोटी 80 लाख रुपयांची तरतुद झालेली आहे.
मतदारसंघातंर्गत असलेल्या तीन्ही तालुक्यात शासकीय कार्यालय व निवासस्थाने उभारण्यासाठी जो निधी मंजूर झालेला आहे त्यामध्ये शिरुर अनंतपाळ तालुक्यात तीन मंडल अधिकार्यांची कार्यालय व निवासस्थाने बांधकामासाठी 45 लाख रूपये तर 15 तलाठ्यांसाठी कार्यालय व निवासस्थाने उभारणीसाठी 2 कोटी 25 लाख रूपयांच्या निधीची तरतुद झालेली आहे. निलंगा तालुक्यात 33 तलाठी कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी 95 लाख रूपये तर 6 मंडल अधिकार्यांची कार्यालय उभारण्यासाठी 90 लाख रूपयांच्या निधीची तरतुद करण्यात आलेली आहे. देवणी तालुक्यात 15 तलाठी कार्यालय उभारणीकरीता 2 कोटी 25 लाख तर 3 मंडल अधिकार्यांच्या कार्यालयाकरीता 45 लाख रूपयांच्या निधीची तरतुद झालेली आहे.
या पुरवणी अर्थसंकल्पात निलंगा मतदारसंघातील एकुण 13 कामांसाठी 38 कोटी 68 लाख रूपयांची निधीची तरतुद झाली असल्याने मतदारसंघात लवकरच या कामांना सुरुवात होईल असा विश्वास माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी व्यक्त केला आहे. निलंगा मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रगतीकरीता माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी जो पाठपुरावा सुरु करून निधी उपलब्ध करीत आहेत त्याबद्दल मतदारसंघातील जनतेच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मंत्री आ. निलंगेकर यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.