शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची एन्ट्री झाली. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची तर त्यांच्या इतर ८ सहकाऱ्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. पहिल्याच फटक्यात राष्ट्रवादीच्या खात्यात ९ कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्याने शिंदे गट अस्वस्थ झाला. एकीकडे मंत्रीमंडळ विस्तार कमालीचा रखडलेला, तर दुसरीकडे अचनाक सरकारमध्ये सहभागी झालेल्या राष्ट्रवादीला ९ मंत्रीपद हे काही शिंदे आणि भाजपमधील अस्वस्थांना देखील रुचले नाही.
शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेत NCP हवी असलेली खाते देण्यास विरोध केला आणि मंत्रीपदाची शपथ घेवून आठवडा उलटला तरी राष्ट्रवादीचे मंत्री बिनखात्याचे म्हणूनच आपापल्या मतदारसंघात परतत आहेत.महाविकास आघाडी सरकारमध्ये आणि आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची लाॅटरी लागण्यात मराठवाड्यातील दोन नेते नशिबवान ठरले. एक बीडचे धनंजय मुंडे, तर दुसरे उदगीरचे संजय बनसोडे.अजित पवारांचे कट्टर अशी या दोघांची ओळख. पहाटेच्या शपथविधीपासून ते शिंदे-फडणवीस सरकारमधील सहभागासाठी झालेल्या बंडात या दोघांनी अजित पवारांची भक्कम साथ दिली. त्यामुळे पहिल्या ९ मध्ये या दोघांना स्थान मिळाले नसते तर नवलच. आता मंत्री म्हणून शपथ घेतली, बंगले मिळाले, पुर्वीचा तामझाम पुन्हा दिसू लागला. पण खाते वाटपच न झाल्याने अखेर हे बिनखात्याचे मंत्री आता आपापल्या मतदारसंघात परतत आहेत.
उदगीरचे कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे. आज रेल्वेने लातूरात दाखल झाले. त्यांच्या स्वागतासाठी लातूरचे प्रमुख चौक सजले होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यावर माझे फोटो परवानगी शिवाय वापरू नका, असे बजावणाऱ्या ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे फोटो देखील बॅनरवर होते. त्याची देखील वेगळीच चर्चा या निमित्ताने रंगली होती. शहरातील स्वागतांचा स्वीकार करत बनसोडे मतदारसंघात देखील जाणार आहेत. उदगीर मतदारसंघातून अजित पवार यांनी संजय बनसोडे यांना उमेदवारी देण्याचा यशस्वी प्रयोग गेल्या निवडणुकीत केला.ज्या अजित पवारांमुळे आमदारकी आणि मंत्रीपद मिळाले त्यांचा शब्द बनसोडे यांच्यासाठी प्रमाण मानला जातो. अजित पवारांच्या मोजक्या विश्वासू लोकांच्या यादीत बनसोडे यांनी स्थान पटकावले आहे. त्यामुळे सध्या जरी त्यांना खाते मिळालेले नसले तरी अजित पवार त्यांना मोठी जबाबदारी देतील, अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. लातूरसारख्या भागातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर मोठ्या नेत्यांनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची प्रतिक्रिया बनसोडे यांनी दिली आहे.