राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मंत्रिपदे आणि पालकमंत्रीपदावरून दावेदारी सुरू आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) या दोन नावांची चर्चा आहे. मात्र पालकमंत्री पद आपल्यालाच हवे, असा दावा करताना गोगावलेंनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे शिंदे-फडणवीस-पवार सरकारमध्ये नवा वाद उफाळून येत आहे. मी त्यांच्यापेक्षा (आदिती तटकरे) चांगलं काम करू शकतो, शेवटी महिला आणि पुरुषामध्ये थोडा तरी फरक येतो ना, असं वक्तव्य भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना केलं. यामुळेच आता त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. अजित पवार गट राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनीही गोगावलेंचा समाचार घेतला आहे. गोगावलेंच्या वक्तव्यातून पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे, असं टीकास्त्र चाकणकरांनी सोडले.
चाकणकर ट्विट करत म्हणाल्या, “आज एका ठिकाणी बोलताना शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आम्ही त्यांच्यापेक्षा म्हणजे आदिती तटकरे यांच्यापेक्षा चांगलं काम करू. महिला आणि पुरुष थोडा फरक येतो ना?? असं वक्तव्य केल्याचं निदर्शनास आले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहिलं पण महाराष्ट्रातील कोणतीही महिला मग ती मंत्रीपदावर विराजमान असलेली असो किंवा ती सामान्य गृहिणी असो ती आज कोणत्याही पुरुषापेक्षा कमी नाही. आपल्या या वक्तव्यामधून आपल्या पुरुषी मानसिकतेचे दर्शन सबंध महाराष्ट्राला होत आहे.”
https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1679150180032200704?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1679150180032200704%7Ctwgr%5Ee8697423b38354bf5ed35b13b0115b3d637c3b28%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.sarkarnama.in%2Fmumbai%2Frupali-chakankar-criticizes-bharat-gogawle-she-said-our-male-mentality-cz91