• Sat. Feb 7th, 2026

कलंकाला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का?; सुषमा अंधारेंचा फडणवीसांवर हल्लाबोल

Byjantaadmin

Jul 12, 2023

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यांना ‘कलंक’ (Kalank) म्हणून हिणवल्यानंतर राज्यात राजकीय कलकलाट सुरू आहे. भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. या टीकेला ठाकरे सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी काही दाखले देत उद्धव ठाकरे यांनी वापरलेला शब्द योग्यच असल्याचं ठणकावलं आहे.पुण्यात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल कलंक हा शब्द वापरून चूक केली असं वाटतं का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. उद्धवजींनी अजिबात चूक वगैरे केलेली नाही. ते योग्यच बोलले. कलंकाला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का, असा प्रतिप्रश्नही त्यांनी केला.

  • अमित शहा यांच्या उपस्थितीत घेतलेल्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन श्रीसदस्य मृत्युमुखी पडतात, पण कार्यक्रम घेणारे किंवा तिथं उपस्थित असलेले मृतांच्या घरी साधी सांत्वन भेटही देत नाहीत. ही कलंकित करणारी गोष्ट नाही का?
  • बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर अपघात होऊन अनेक लोक मरण पावले. मृतांची ओळखही पटत नव्हती, अशी स्थिती होती. या मृतांचा अंत्यविधी सुरू असताना एक पक्ष फोडून त्यांचा शपथविधी सोहळा घडवून आणला जातो, ही कलंकित करणारी गोष्ट नाही का?
  • महाराष्ट्रातला एकेक उद्योग राज्याच्या बाहेर जातो, हा कलंक नाही का?
  • राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, हा कलंक नाही का?
  • वारंवार पक्ष फोडून लोकशाही संपवणं हा कलंक नाही का?
  • महाराष्ट्राचं राजकारण जाणीवपूर्वक अस्थिर नको त्या गोष्टींना थारा देत फक्त आणि फक्त स्वत:ची खुर्ची वाचवण्याचा प्रयत्न करणं हा कलंक नाही का?
  • एकीकडं फडणवीसांच्या पत्नी बुकीसोबत वावरतात, दुसरीकडं…

    भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन करणाऱ्या तृतीयपंथीयांवर पोलिसी बळाचा वापर करण्यात आला. याचाही सुषमा अंधारे यांनी यावेळी तीव्र निषेध केला. ‘आजचा प्रकार हा गृहखात्यावर आणखी एक कलंक लावणारा आहे. आम्हाला न्याय द्या अशी मागणी करणं ही सुद्धा गुन्हा झाला आहे. खुद्द फडणवीसांच्या पत्नी एका कुख्यात बुकीसोबत वावरतात. त्यांच्या नुसत्या सांगण्यावरून तात्काळ गुन्हे दाखल होतात. अटका होतात. गुजरातपर्यंत पोलीस जातात. याउलट इथं अन्नपाण्याविना न्याय मागणाऱ्यांना न्याय दिला जात नाही. यावरून पोलिसांवरील दबावाची कल्पना करता येईल, याकडंही सुषमा अंधारे यांनी लक्ष वेधलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *