• Thu. Jun 26th, 2025

राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर कोणती कारवाई होणार?, काँग्रेसच्या बड्या नेत्याने नियमच सांगितला

Byjantaadmin

Jul 10, 2023

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह पक्षातील आठ आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळं राष्ट्रवादीत उभी फूट पडली असून दोन्ही गटाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिलं आहे. त्यामुळं आता अजित पवार समर्थक आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता असतानाच काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठं विधान केलं आहे. अजित पवारांना पक्षातील दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा नसल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार असल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे.

माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादीतून बंड करणाऱ्या अजित पवार यांच्या गटाकडे दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा नाहीये. त्यामुळं त्यांच्या गटावर पक्षांतरबंदी कायद्यानुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. अजित पवारांकडे सध्या सर्वाधिक आमदार नसल्याने त्यांच्या गटातील सर्व आमदार लवकरच निलंबित होणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. अजित पवारांकडे ३६ आमदार असते, तर त्यांनी शक्तिप्रदर्शन केलं असतं. परंतु त्यांच्याकडे तेवढी संख्या नसल्याने राज्यात आणखी मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतून बंड करणारे आमदार तसेच मंत्र्यांचं सदस्यत्व रद्द होणार असल्याचं भाकित माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.दरम्यान राष्ट्रवादीचे विधानसभेतील प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी पक्षातील बंडखोर आमदारांवर कारवाईसाठी विधानसभाध्यक्षांना पत्र लिहिलं आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या गटाकडूनही राष्ट्रवादीच्या आमदारांना निलंबित करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीतील फूट आणि आमदारांच्या निलंबनावर विधानसभेत मोठा निर्णय होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजित पवार यांच्या गटाने राष्ट्रवादीवर दावा ठोकत थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यामुळं आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *