मुंबई:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीवर त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे बसल्याचा फोटो व्हायरल झाल्याने चांगलाच वादंग निर्माण झाला. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या फोटोची चर्चा रंगलीय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा आरोप करत आधी श्रीकांत शिंदे यांचा फोटो व्हायरल झाला होता. आता शिंदे गटाच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळे यांचा फोटो ट्वीट केला. या फोटोमध्ये सुप्रिया सुळे या मुख्यमंत्र्यांच्या खुचीत बसल्याचा दावा केला जातोय.



सुप्रिया सुळेंवर आरोप करत करण्यात आलेल्या या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत याबाबत ट्विट केले. हा फोटो मॉर्फ केलेला असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. फोटोत छेडछाड करुन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत सुप्रिया सुळे यांना बसवल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे. तसे दोन वेगवेगळे फोटोही राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेअर करण्यात आले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा आदिती नलावडे यांनीही हा फोटो मॉर्फ केल्याचं म्हणत शीतल म्हात्रे यांच्या विरोधात ऑनलाईन तक्रार दिली आहे. आता त्यांना सांगा काय ते Editing, काय ते Morphing, सर्व कसं ओके करणार आहेत , असे ट्विट त्यांनी केले. तसेच आदिती नलावडे यांनी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. शीतल म्हात्रे यांनी जाहीर माफी मागावी आणि सुप्रिया सुळे यांचा मॉर्फ फोटो ट्विटरवरून काढा किंवा मागे घ्या. अशी मागणी आदिती नलावडे यांनी केली आहे.