मुंबई 06 जुलै : राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. रविवारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतल्या 9 मंत्र्यांनी शपथ घेतली. अशातच आता उर्वरित मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारच्या उर्वरित होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाला मंत्रीपद मिळणार नसल्याचं समोर येत आहे. लवकरच होणाऱ्या विस्तारात फक्त शिवसेना आणि भाजपच्या आमदारांमध्ये मंत्रीपद समान वाटली जाणार असल्याची माहिती आहे. यात शिवसेनेच्या वाट्याला आणखी 7 मंत्रीपदं येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळाली आहे.
अजितदादा गटाच्या आमदारांची सरकारमध्ये अचानक झालेली एँट्री आणि त्यांना तातडीने दिलेली मंत्रीपद यावरून शिवसेनेसोबत भाजप आमदारांमध्येही अस्वस्थता असल्याचं बोललं जात आहे. अशातच आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत ही महत्त्वाची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर राष्ट्रवादीचे आमदार कुणासोबत? याचा संभ्रम निर्माण झाला, याची पहिली चाचपणी बुधवारच्या दोन्ही गटाच्या बैठकांमधून करण्यात आली. ज्यात राष्ट्रवादीच्या 40 हून जास्त आमदारांचा अजित पवारांना पाठिंबा असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या आमदारांमध्ये 42 आमदार हे विधानसभेचे आहेत, तर 2 आमदार विधान परिषदेचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व आमदारांनी अजित पवार यांच्या समर्थनाचं प्रतिज्ञापत्र दिले आहे.