सास्तुर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
लोहारा ( उस्मानाबाद ) : लोहारा तालुक्यातील सास्तुर परिसराला बुधवारी दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास १.८ रिस्टर स्केलचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
लोहारा तालुक्यातील सास्तुरसह परीसरात अधूनमधून भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. आज दुपारी ४ वाजून ३२ मिनिटाच्या सुमारास लोहारा तालुक्यातील सास्तूर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. जमीनितून गूढ आवाज आला. यामुळे जमिन हादरली. सास्तूर, एकोंडी (लो) होळी, उदतपूर, सालेगाव, तोरंबा, हराळी, रेबेचिंचोली या परिसरालाही भूकंपाचा धक्का बसल्याची चर्चा नागरिकांत होती. दरम्यान, लातूर येथील भूकंपमापक केंद्रात १.८ रिस्टरस्केलची नोंद झाली असल्याची माहिती वैज्ञानिक सहाय्यक के.जी. परदेशी यांनी दिली. या जाणवलेल्या धक्क्यामुळे सन १९९३ साली झालेल्या प्रलंयकारी भूकंपाची अठवण जागी झाली.
सन १९९३ च्या भूकंपानंतर या भागात शंभर टक्के पुनर्वसन झालेले आहे. त्यामुळे भूकंपरोधक घरांमध्ये सध्या नागरिकांचे वास्तव्य आहे. मात्र यापूर्वी झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपात हजारो नागरिकांनी आपला जीव गमावला होता. त्या दुःखाच्या जखमा आजही अनेकांच्या काळजावर जीवंत आहेत. अनेकांना त्यामुळे अनाथ आयुष्य वाट्याला आले होते. या सौम्य भूकंपाने त्या आठवणीच्या वेदना जाग्या केल्या.