बीड, 4 जुलै : राज्याच्या राजकारणातील मातब्बर नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे या बहिण भावातील संघर्ष राज्याला नवीन नाही. 2019 च्या पराभवानंतर पंकजा मुंडे यांनी 2024 च्या निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले आहे. मात्र, राज्याचा राजकारणात राष्ट्रवादीने शिंदे फडणीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने सर्वत्र पेच निर्माण झाला आहे. यातच पंकजा मुंडे आणि भाजप पक्षश्रेष्ठी मध्ये सर्वकाही अलबेल नसल्याने नेमकं पंकजा मुंडे यांच्या राजकारणाची भूमिका या सर्व घडामोडींमध्ये महत्त्वाची ठरणार आहे.
बीडमध्ये पुन्हा बहीण-भावात संघर्ष
बीडमध्ये राष्ट्रवादी आणि भाजप प्रमुख विरोधक आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये नेमकी लढत कुणाशी करायची आणि तयारी कोणी करायची यावरून पेच निर्माण झाला असल्याचं ज्येष्ठ पत्रकार संपादक बालाजी मालगुडे यांनी सांगितले. भाजप लोकसभेला पंकजा मुंडेंना उमेदवारी देऊन विधानसभा धनंजय मुंडे साठी सोडतील असा अंदाजही व्यक्त केला. पंकजा मुंडे यांच्यासमोर एक तर स्वतंत्र लढणार किंवा बीआ एसचा पर्याय शोधणे हेच योग्य राहील, असे देखील बालाजी मार्गाने सांगितलं.
लोकसभा निवडणुकीसाठी गेल्या 9 वर्षांमध्ये खासदार प्रीतम मुंडे यांनी केलेल्या कामामुळे 2024 च्या निवडणुकीला विरोधकांना उमेदवार मिळत नव्हता आता तर राष्ट्रवादीच सोबत आल्याने 2024 ची निवडणूक बिनविरोध होतो की काय अशी स्थिती निर्माण झाल्याचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते पंकजा मुंडे समर्थक राम कुलकर्णी यांनी सांगितले.तर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना विचारलं असता आमच्या दृष्टिकोनातून पंकजा मुंडे याच आमच्या नेत्या आणि पंकजा मुंडे याच आमच्या पक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल त्या निर्णयाच्या आम्ही पाठीशी राहू. निवडणुकांच्या अनुषंगाने एक लोकसभा आणि 6 विधानसभा याची तयारी करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी आम्हाला आदेश दिले आहेत, असे देखील भाजपचे जिल्हा सरचिटणीस एडवोकेट सर्जेराव तांदळे यांनी सांगितलं.येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्रित लढतील असं वाटत नाही. आता दोघांच्याही महत्त्वकांक्षा आणि मतदार वेगळा आहे. ते एकत्र दोघांच्या भविष्यासाठी बाधक असल्याचं मत राजकीय विश्लेषक भागवत तावरे यांनी सांगितलं. बीड मधील पत्रकार आणि राजकिय जाणकारांमध्ये येणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा सभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यामधील सत्ता संघर्ष कायम राहील. तसेच लोकसभा निवडणुकीत फायदा झाला तरी विधानसभेसाठी मोठा पेचे निर्माण होत असल्याची स्थिती आहे. शेवटी वेळच यावर उत्तर शोधेल.