भारतातील सर्वात मोठी बँक अशी ओळख मिरवणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने नव्या स्वरुपात योनो अॅप ग्राहकांना उपलब्ध करून दिले आहे. आता योनो अॅपच्या मदतीने स्टेट बँकेचे ग्राहक कोणत्याही बँकेच्या एटीएममधून विनाकार्ड त्यांच्या खात्यातील पैसे काढू शकतील. तसेच कोणतीही व्यक्ती स्टेट बँकेच्या ग्राहकाच्या योनो अॅपचा क्यूआर कोड स्कॅन करून त्याला पैसे देऊ शकेल. यामुळे नवे योनो अॅप वापरणाऱ्या स्टेट बँकेच्या ग्राहकांना आर्थिक व्यवहार करणे अतिशय सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

स्टेट बँकेने शनिवार 1 जुलै 2023 रोजी SBI स्थापना दिनाचे औचित्य साधून नव्या योनो अॅपचे लाँचिंग केले. सध्या भारतात योनो अॅप वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 6 कोटींपेक्षा जास्त आहे. यामुळे योनो अॅपच्या नव्या सुविधांचा अनेक ग्राहकांना फायदा होईल, असे स्टेट बँकेच्यावतीने सांगण्यात आले.भारतातील 21 जिल्ह्यांमध्ये 34 ठिकाणी स्टेट बँकेने बँकिंग हब सुरू केले आहे. या हबमध्ये बँकांशी संबंधित सर्व योसीसुविधा एकाच छताखाली सहज उपलब्ध आहेत. यामुळे बँकेशी संबंधित आर्थिक व्यवहार करणे नागरिकांसाठी आणखी सोपे आणि सुरक्षित झाले आहे. बँकिंग हबद्वारे खात्यात पैसे जमा करणे, खात्यातून पैसे काढणे, विशिष्ट योजनांमध्ये गुंतवणूक करणे, गुंतवणूक केलेल्या रकमेतील ठराविक हिस्सा वा सगळी रक्कम काढून घेणे, विशिष्ट बिलांचा बँकेच्या माध्यमातून भरणा करणे, विशिष्ट सेवांसाठी बँकेच्या माध्यमातून पैसे देणे अशा अनेक सोयीसुविधा एकाच छताखाली मिळतात. कर्ज काढण्यासाठी आवश्यक असलेली प्रक्रिया पण बँकिंग हबमध्ये करता येते.
योनो अॅप
स्टेट बँकेने 2017 मध्ये लाँच केलेल्या योनो अॅपचे आतापर्यंत 6 कोटींपेक्षा जास्त ग्राहक झाले आहेत. कोणत्याही स्मार्टफोनमध्ये हे अॅप डाऊनलोड करणे शक्य आहे. योनो अॅपच्या मदतीने आर्थिक व्यवहार करणे सोपे, सुरक्षित आणि वेगवान आहे. अॅपमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता राखण्यास मदत होते.
योनो अॅपद्वारे ATM मधून पैसे काढण्याची प्रक्रिया
योनो अॅपच्या कॅश विड्रॉव्हल सेक्शनवर टॅब करा. स्वतःच्या खात्यातील जेवढी रक्कम काढायची असेल तेवढी रक्कम आकड्यांच्या स्वरुपात टाइप करा. नंतर अॅप एक क्यूआर कोड तयार करेल. हा कोड एटीएममध्ये जाऊन स्कॅन करा. आता एटीएमकडून ग्राहकाला त्याच्या यूपीआय आयडी आणि पिनबाबत विचारणा होईल. ही माहिती देताच ग्राहकाला रोख रक्कम मिळेल. ही सोपी, सुरक्षित आणि वेगवान प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत विनाकार्ड एटीएममधून पैसे काढणे शक्य आहे.