निलंगा ( प्रतिनिधी ) तालुक्यातील लातूर जहीराबाद महामार्गावरील तगरखेडा मोड ते तगरखेडा रस्त्याचे डांबरीकरणाचे काम ठेकेदाराने संबंधित अधिकाऱ्याला हाताशी धरून निकृष्ट दर्जाचे केल्याने रस्त्याची खड्याने अक्षरशः दोन वर्षातच चाळणी झाली आहे . खड्ड्यामुळे रस्त्यात गाड्या अडकून वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे . वाहनधारकांना तारेवरची कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत . या खड्ड्यामुळे अपघाताची मालिका सुरू झाली आहे . तसेच ठेकेदारांनी साईड पट्टीचे व नालीचे काम केले नसल्याने शेतीतील पाणी रोडवर येऊन रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था झाली आहे . याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अर्थ पूर्ण दुर्लक्ष असल्याने ठेकेदारांनी थातूर मातूर काम करीत बिले उचलले असल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे . निकृष्ट दर्जाचे काम करून बिले उचलणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व यातील दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याची मागणी नागरिकातून होत आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की निलंगा तालुक्यातील लातूर जहीराबाद महामार्गावरील तगरखेडा मोड ते तगरखेडा साडेतीन किलोमीटरच्या कामाची 505404 म्हणजे इतर जिल्हा प्रमुख जिल्हा याकरिता या हेड खाली दि 28 – 12 – 2018 रोजी वर्क ऑर्डर झाली . हे डांबरीकरणाचे काम सप्टेंबर 2020 मध्ये पूर्ण झाले या कामाची एक कोटी 28 लाखाची प्रशासकीय मान्यता असून एक कोटी 24 लक्ष तांत्रिक मान्यता आहे यात ठेकेदारांनी बीबीएम कार्पेट सील कोट साईड पट्ट्या मुरूम भरणे नाली काम करणे तगरखेडा गावात 200 मीटर सिमेंट रस्ता करणे व इतर रस्ता डांबरीकरण करणे बंधनकारक होते या कामाचा तीन वर्षापर्यंत दोष निवारण कालावधी आहे म्हणजेच रस्ता दुरुस्तीचे तीन वर्षापर्यंतचे संबंधित एजन्सीला बंधनकारक आहे . संबंधित ठेकेदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण सहकार्य करत अत्यंत निकृष्ट दर्जाचे डांबरीकरणाचे काम केल्याने दोन वर्षातच सदर रस्त्यावर मोठमोठी खड्डेच खड्डे पडले आहेत रस्त्यावरील खड्ड्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे वाहन चालकांना तारेवरची कसरत करत या रस्त्यावरून मार्गस्थ व्हावे लागत आहे खड्ड्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झालेली असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभागाला याकडे पाहण्यास वेळ नसल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे शिवाय ठेकेदारांनी मनमानी करत साईड पट्ट्याचे व नाली काम केले नसल्याचा संताप नागरिकांतून व्यक्त होत आहे संबंधित एजन्सीकडे रस्ता दुरुस्तीचे तीन वर्षापर्यंतचे काम असून देखील रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेली असताना या रस्त्याची डागडुजी का केली जात नाही असा प्रश्न उपस्थित करत सदर रस्त्याचे काम संबंधित एजन्सी कडून होत असताना सां बा विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली नाही का ? यावर नेमका अंकुश कोणाचा ? थातूरमातूर काम करून बिले लाटणाऱ्या एजन्सीवर कार्यवाही केली जाणार का ? यातील दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाहीचा बडगा उगारला जाणार का ? साईड पट्ट्याचे काम न करता संबंधित एजन्सीला बिल कसे देण्यात आले अशी अनेक प्रश्न उपस्थित करत निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी आणि सदर रस्त्यावरील पडलेली मोठ मोठी खड्डे तात्काळ बुजवून डांबरीकरणाचे काम करून वाहतुकीचा मार्ग मोकळा करण्यात यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे
तगरखेडा मोड ते तगरखेडा रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या नाल्या बुजल्याने शेतातील पाणी रस्त्यावर येऊन रस्ता खड्डेमय बनला आहे यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे सदर रस्त्यालगतच्या दुतर्फा नाल्या साफ करून रस्त्यावरील खड्डे बुजून डांबरीकरणाचे काम तात्काळ करण्यात यावे अन्यथा दि 16 . 11 . 2022 रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा निलंगा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मदन बिरादार , शहराध्यक्ष मुजीब सौदागर यांनी कार्यकारी अभियंता गणेश क्षिरसागर यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला आहे .