नागपूर गरिबांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी शासनाकडून मोफत धान्य देण्यात येते. प्राधान्य गटासाठी २ किलो गहू आणि ३ किलो तांदूळ याप्रमाणे प्रतिव्यक्ती ५ किलो धान्य दिले जात होते. मात्र, या निर्णयात आता बदल करत १ किलो गहू आणि ४ किलो तांदूळ देण्यात येणार आहेत. १ जुलैपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे जिल्हा पुरवठा शाखेतर्फे सांगण्यात आले.
‘अंत्योदय’साठी पूर्वीचाच नियम
शहरात प्राधान्य गटात मोडणारे ३ लाख ३१ हजार ७७५ रेशनकार्डधारक आहेत. कुटुंबातील सदस्यांची संख्या १४ लाख ११ हजार २० आहे. ग्रामीण भागात प्राधान्य गटातील ३ लाख १५ हजार २११ रेशनकार्ड असून सदस्यांची संख्या १३ लाख ३६ हजार ४१४ आहे. या नागरिकांना शनिवारपासून केवळ एकच किलो गहू मिळणार आहेत. अंत्योदय गटातील नागरिकांना मात्र पूर्वीप्रमाणेच प्रती रेशनकार्ड ३५ किलो धान्य देण्यात येईल. यात १० किलो गहू आणि २५ किलो तांदूळ मिळणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे यांनी सांगितले. जिल्ह्यात अंत्योदय रेशनकार्ड धारकांची संख्या १ लाख २१ हजार ८३१ आहे