बुलडाणा, 1 जूलै : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. शनिवारी पहाटे बसचा भीषण अपघात घडला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये बसमधील 25 जणांचा जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर आठ प्रवाशी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या बसमधून एकूण 33 प्रवासी प्रवास करत होते.
बस पुण्याकडे जात असताना अपघात
ही प्रवासी बस नागपूरहून पुण्याकडे जात असताना हा अपघात झाला. मिळत असलेल्या माहितीप्रमाणे ही बस विदर्भ ट्रॅव्हल्सची होती. समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ बस रस्ता दुभाजकावर आदळली. यानंतर बसला आग लागली. प्रवासी झोपेत असल्यामुळे त्यांना बाहेर पडता आला नाही. या अपघातामध्ये 25 जणांचा जळून मृत्यू झाला आहे. तर आठ जण बचावले आहेत. यामध्ये तीन चिमुकल्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
पोलिसांची प्रतिक्रिया
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी पहाटे या बसचा अपघात झाला. बस रस्ता दुभाजकावर आदळली. बसचं टायर फुटल्यामुळे किंवा चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. बसमधील जे मृत व्यक्ती आहे, त्यांची ओळख पटवण्याचं काम चालून असून, ओळख पटवल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुंटुंबाकडे सोपवण्यात येतील अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.