ऊन असो वा पाऊस असो मोर्चा निघणारच!असं म्हणत उद्या (1 जुलै) ठाकरे गटाकडून मुंबई महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप करत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वात हा धडक मोर्चा निघणार आहे. मेट्रो सिनेमा, मरीन लाईन्सपासून ते मुंबई महापालिका मुख्यालयापर्यंत हा मोर्चा निघणार असून यामध्ये मुंबईतील नेत्यांपासून ते अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हजारोच्या संख्येने ठाकरे गटाचे शिवसैनिक एकत्र येणार आहेत. कोणते महत्त्वाचे मुद्दे या मोर्चात ठाकरे गटाकडून उचलले जाणार? कशाप्रकारे मोर्चाचा स्वरुप असणार? हे जाणून घेऊया
मुंबई महापालिकेत वर्षभरापासून नगरसेवक नाहीत. मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हातात आहे आणि त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय कारभारात हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वेळोवेळी करण्यात आला आहे. मग रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा असू द्या किंवा मग स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा. आता याच भ्रष्टाचाराविरोधात, मुंबईची वाट लावू पाहणाऱ्या विरोधात हा मोर्चा असल्याचा ठाकरे गटाकडून सांगण्यात आला आहे.
कसे असणार ठाकरे गटाच्या मोर्चाचे स्वरुप?
- ठाकरे गटाचा मोर्चा मेट्रो सिनेमा मरीन लाईन्सपासून मुंबई महापालिका मुख्यालयाच्या दिशेने निघेल
- या मोर्चाचा नेतृत्व ठाकरे गटाचे आमदार युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे करतील यामध्ये मुंबईतील सर्व ठाकरे गटाचे आमदार खासदार उपस्थित असतील
- ठाकरे गटाच्या आमदार खासदारापासून ते विभाग प्रमुख, विधानसभा समन्वयक, शाखाप्रमुख ,गट प्रमुख अगदी सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याच्या आणि बीएमसी भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवण्याच्या सूचना दिल्या आहेत
- मुंबईतील सर्वसामान्य जनतेला सुद्धा या मोर्चात सहभागी होण्याचा आवाहन ठाकरे गटाकडून करण्यात आलाय
- या मोर्चामध्ये कुठल्याही प्रकारचे निवेदन ठाकरे गट देणार नसून मुंबई महापालिका मुख्यालयासमोर स्टेज उभारून मुंबई महापालिका प्रशासनाच्या भ्रष्टाचारी कारभाराविरोधात ठाकरे गटाचे नेते भाषण करतील
- मुंबईत वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खाजगी वाहने घेऊन न येता लोकलने प्रवास करत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल आणि चर्चगेट येथे पोहोचण्याच्या सूचना दिल्या आहे
‘राज्य सरकारचा बीएमसीमधील 88 हजार कोटींच्या ठेवीवर डोळा’
मुंबई महापालिकेत प्रशासक जरी कारभार पाहत असले तरी याच प्रशासकाद्वारे राज्य सरकारकडून मोठा भ्रष्टाचार विविध कंत्राट देताना होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे. मुंबई महापालिकेतल्या 88 हजार कोटींच्या ठेवीवर राज्य सरकारचा डोळा असून मुंबईची वाट लावण्याचे काम केले जात असल्याचं ठाकरे गटाचे म्हणणं आहे. मुंबई महापालिकेमध्ये सहा हजार कोटींचा रस्ते घोटाळा, 263 कोटींचा स्ट्रीट फर्निचर घोटाळा, खडी घोटाळा, सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन घोटाळा, रोषणाई, वाढते वीज बिल या सगळ्याविरोधात हा मोर्चा काढला जात आहे.
एकीकडे मुंबई महापालिकेच्या कथित कोविड सेंटर घोटाळ्यामध्ये ठाकरे गटाच्या नेत्याची निकटवर्तीयांची ईडी चौकशी केली जात असून ठाकरे गटाला टार्गेट केलं जात आहे. त्यात मुंबई महापालिकेवर ठाकरे गट मोर्चा काढून बीएमसीमध्ये भ्रष्टाचार सुरु असल्याचा आरोप करत या मोर्चात मोठं शक्तिप्रदर्शन करणार आहे. त्यामुळे हा मोर्चा एक प्रकारे बीएमसी प्रशासनाला जाब विचारणारा आणि राज्य सरकारला उत्तर देणारा ठरणार असं ठाकरे गटाकडून म्हटलं जात आहे.