शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांना मंत्रीपद मिळालं तर महाराष्ट्रामध्ये मटक्याला अधिकृत परवानगी मिळेल असा खोचक टोला राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला. ते हिंगोलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी संतोष बांगर यांच्यावर टीका केली. मागील काहीच दिवसांपूर्वी संतोष बांगर यांनी पुढील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मला शंभर टक्के मंत्रीपद मिळेल अशी माहिती दिली होती. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली.
महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याबाबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. सध्याच्या सरकारइतकं अपयशी सरकार राज्यात कधीच राहीलं नाही. राज्यात भ्रष्टाचार सुरु आहे. शेतकऱ्यांचे कोणतंही काम होत नाही. शेतकर्यांवर अन्याय होत आहे. अतिवृष्टीची मतद देखील अद्याप झाली नाही. त्यामुळं हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीकडे नेणारं सरकार असल्याची टीका दानवेंनी केली.
नेमकं काय म्हणाले होते संतोष बांगर
काहीच दिवसांपूर्वी शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी सांगितले होते की पुढील मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये मला शंभर टक्के मंत्रीपद मिळेल. तुम्ही काळजी करु नका असेही बांगर म्हणाले होते. मराठवाड्यातील नेता आम्हाला मंत्रीमंडळात घ्यायचा असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे संतोष बांगर म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर अंबादास दानवे यांनी सडकून टीका केली.
शिंदे-फडणवीस सरकारची वर्षपूर्ती
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आज एक वर्षं पूर्ण होतंय. गेल्या वर्षी 30 जून रोजी शिंदे आणि फडणवीसांनी अनुक्रमे मुख्यमंत्रिपद आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 20 ते 30 जून 2022 या काळात महाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय नाट्य घडलं. 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. एकनाथ शिंदे यांनी maharshtra चे 20 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 40 आमदारांना सोबत घेत शिवसेनेतून बंड केले, त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर शिवसेना पक्षासाठी ठाकरे आणि शिंदे यांच्यात लढाई झाली, निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला.