• Wed. Apr 30th, 2025

मोदी @ 9 अभियाना अंतर्गत विकासतिर्थ मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा आढावा

Byjantaadmin

Jun 28, 2023

मोदी @ 9 अभियाना अंतर्गत विकासतिर्थ मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा आढावा

खा. शृंगारे, माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्यासह मान्यवराची उपस्थिती

लातूर/प्रतिनिधीः- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला नऊ वर्ष पुर्ण झालेली आहेत. त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने मोदी @9 अभियान राबविले जात आहे. या अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या विकास कामाची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या भागात मोठी विकासकामे झालेली आहेत त्या कामांना विकासतिर्थ असे संबोधीत करून त्या ठिकाणी भेटदेण्याचे नियोजन केले जात आहे. एक भाग म्हणून लातूर येथे उभारण्यात येत असलेल्या मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीचा आढावा घेण्यात आला. ही रेल्वे कोच फॅक्टरी लातूरच्या विकासातील मैलाचा दगड ठरणारी असून मराठवाड्याच्या विकासालाही या फॅक्टरीमुळे गती प्राप्त होईल असा विश्वास विविध मान्यवराच्या वतीने व्यक्त करण्यात आला. यावेळी खा. सुधाकर श्रृंगारे, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा खा. तिरथसिंह रावत, मध्यप्रदेश पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष विनोद गोटिया, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
देशातील चौथा आणि महाराष्ट्रातील पहिला रेल्वे कोच बनविण्याचा कारखाना लातूरात उभारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने हा कारखाना मंजूर केलेला असून त्याचे काम पुर्णत्वास जात आहे. मोदी सरकारचे नऊ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल भाजपाच्या वतीने वेगवेगळे अभियान राबविण्यात येत आहेत. या अभियानाचा एक भाग म्हणून लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी म्हणजेच विकास तिर्थ असे संबोधून या फॅक्टरीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्याच्या विकासाला चालना देऊन अनेक विकास व लोकहिताच्या योजना राबविलेल्या आहेत. त्याचबरोबर रोजगार प्राप्त होऊन विकासाला गती प्राप्त व्हावी या उद्देशाने लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी उभारली जात आहे. या फॅक्टरीचे काम अंतीम टप्यात आले असून लवकरच या फॅक्टरीचे लोकार्पण होणार आहे. या फॅक्टरीच्या माध्यमातून जगभरात प्रसिद्ध असलेल्या वंदे भारत रेल्वेचे कोच तयार करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे लातूरातील या फॅक्टरीत बनविण्यात येणारे वंदे भारत रेल्वे कोच जगभरातही निर्यात केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरीत पहिल्या वर्षी 12  दुसर्‍या वर्षी 18 तर तिसर्‍या वर्षी 25 वंदे भारत रेल्वेंची निर्मिती होणार आहे. या कोच फॅक्टरीसाठी एकुण 430 एक्कर जागा उपलब्ध करण्यात आली असून 351 एक्कर जागेवर या फॅक्टरीची उभारणा होत आहे. त्याचबरोबर 24 एक्कर जागेवर रेल्वे अधिकारी व कर्मचार्‍यांची निवासस्थाने बांधली जाणार आहेत. आजपर्यत 676 कोटी रक्कम या फॅक्टरीच्या उभारणीसाठी खर्च करण्यात आले आहेत. लवकरच या फॅक्टरीचे लोकार्पण होणार असल्याने लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील बेरोजगारांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होणार आहे. विशेष म्हणजे देशभरात असलेल्या रेल्वे कोच फॅक्टरींमध्ये लातूरची ही कोच फॅक्टरी सर्वात मोठी असल्याची माहिती यावेळी रेल्वे अधिकार्‍यांनी दिली. या आढावा बैठकीच्यावेळी खा. सुधाकर शृंगारे यांनी या कोच फॅक्टरीत 70 टक्के रोजगार स्थानिकांना प्राप्त होणार असल्याचे सांगून ही कोच फॅक्टरी केवळ लातूर जिल्ह्यासाठी
नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यासाठी विकासतिर्थ ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर ही रेल्वे कोच फॅक्टरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लातूरकरांसाठी केलेली मोठी भेट असून या कोच फॅक्टरीचे मुळे लातूरचे नाव संपुर्ण जगभरात जाणार असल्याने लातूरकरांसाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
या आढावा बैठकीसाठी उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तथा खा. तिरथसिंह रावत, मध्यप्रदेश पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष विनोद गोटिया, भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आ. रमेश कराड, लोकसभा प्रमुख  दिलीपराव देशमुख, माजी खा. सुनिल गायकवाड, माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी आ. धर्माजी सोनकवडे, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, लातूर प्रभारी प्रा. किरण पाटील, शहर जिल्हाध्यक्ष गुरुनाथ मगे, शैलेश लाहोटी, जिल्हा संघटन सरचिटणीस संजय दोरवे, शहर संघटन सरचिटणीस अ‍ॅड. दिग्विजय काथवटे, जिल्हा उपाध्यक्ष शेषेराव ममाळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चेवले, तुकाराम गोरे आदींसह लोकप्रतिनिधी, पक्षपदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed