• Wed. Apr 30th, 2025

लातूर येथे शासकीय महाविद्यालयात पहिली कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

Byjantaadmin

Jun 28, 2023

लातूर येथे शासकीय महाविद्यालयात पहिली कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी !

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात झाली शस्त्रक्रिया

लातूर,  (जिमाका): हेलन केलर यांच्या जयंतीदिनी 27 जून रोजी लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली पहिली कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. औसा तालुक्यातील याकतपूर येथील दिव्यांग मुलावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेतला होता. तसेच यासाठी विविध विभागांचा समन्वय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

जन्मतःच श्रवण क्षमतेचा अभाव असलेल्या याकतपूर येथील मुलाच्या पालकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे इतर मुलांप्रमाणे आपल्याही मुलाला ऐकायला यावे, यासाठी हे पालक प्रयत्न करीत होते. मात्र, याकरिता कराव्या लागणाऱ्या कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रियेसाठी येणारा खर्च खूप होता आणि या शस्त्रक्रियेची सुविधा लातूर येथे उपलब्ध नसल्याने त्यांना आपल्या मुलावर शस्त्रक्रिया करता येत नव्हती.

लातूर येथे कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया सुरु करण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पुढाकार घेवून विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांना तशा सूचना दिल्या होत्या. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी या शस्त्रक्रियेसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शविली. जिल्हा समाज कल्याण कार्यालयामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जोशी हे स्वतः सर्जन असल्याने त्यांनी शस्त्रक्रियेची तयारी दर्शविली. जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे, संवेदना प्रकल्पाचे कार्यवाह सुरेश पाटील यांनी पालकांचे समुपदेशन आणि शस्त्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रियेची जबाबदारी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. समीर जोशी यांनी पार पाडली. 27 जून रोजी सकाळी नऊ ते दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत ही शस्त्रकीया सुरु होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर मुलाची आईने सर्व डॉक्टर्स आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मनापासून आभार मानले.

मराठवाड्यातील पहिलीच कॉक्लियर इंप्लांट शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जोशी यांनी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, सर्व सहकारी डॉक्टर्स डॉ. माधुरी मोरे, डॉ. चित्रांजली, भूलतज्ञ डॉ. चव्हाण, डॉ. तोडकरी, डॉ. आगळे व इतर डॉक्टर्स तसेच पुणे येथून या शस्रक्रियेसाठी आलेले डॉ. अफसान शेख, डॉ. मुग्धा म्हात्रे यांचे आभार मानले. तसेच अशा शस्रक्रिया भविष्यातही लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये होतील, असा विश्वास व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed