गोळी झाडून 7 तास वेदिकाला कारमध्ये फिरवत होता भाजप नेता, त्यानंतर ओलांडली क्रूरतेची सीमा
भोपाळ 27 जून : मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील वेदिका ठाकूर हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. एमबीएचं शिक्षण घेणाऱ्या तरुणीवर गोळी झाडण्यात आली होती, आता या प्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेदिकावर गोळी झाडल्यानंतर आरोपी भाजप नेता प्रियांश विश्वकर्मा तिला 7 तास त्याच्या कारमध्ये घेऊन फिरत होता. एमबीएची विद्यार्थिनी वेदिका ठाकूरवर 10 दिवस उपचार सुरू होते, पण सोमवारी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. तिला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.
या संदर्भात ‘आज तक’ने वृत्त दिलंय. पोलिसांनी आता या प्रकरणातील आरोपी नेता प्रियांश विश्वकर्मा याच्याविरुद्ध आधीच नोंद झालेल्या गुन्ह्यात हत्येचा आरोप जोडला आहे. वेदिकाच्या मृत्यूनंतर आता या हत्येबाबत नवा खुलासा झाला आहे. वेदिकावर गोळीबार केल्यानंतर आरोपी प्रियांश 7 तास तिला घेऊन कारमध्ये फिरत होता. इतकंच नाही तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी कथित भाजप नेता प्रियांश विश्वकर्मा ऑफिसमध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर आणि पिस्तुल घेऊन फरार झाला होता.
16 जून रोजी भाजप नेत्याने त्याच्याच ऑफिसमध्ये वेदिकावर गोळी झाडली होती. या प्रकरणी पोलिसांनी 19 जून रोजी प्रियांश विश्वकर्माला अटक केली होती. त्यावेळी पोलिसांनी आरोपी प्रियांशविरुद्ध कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करून त्याची तुरुंगात रवानगी केली होती. मात्र, सोमवारी वेदिकाच्या मृत्यूनंतर ते कलम आता 302 (हत्या) करण्यात आले आहे.
वेदिकाच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी पोस्टमॉर्टेम केलं आणि तिच्या शरीरात अडकलेली एक गोळी काढली, ती पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. आता ही गोळी एफएसएल टीमकडे तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. वेदिकाच्या पोटात सापडलेली गोळी प्रियांशकडे असलेल्या पिस्तुलातून चालवण्यात आली होती की नाही याची बॅलेस्टिक तज्ज्ञ पुष्टी करतील.
व्यवसायाने बिल्डर आणि तथाकथित भाजप नेता प्रियांश
वेदिकावर गोळीबार केल्यानंतर पुरावे गायब केल्याचा आरोप विश्वकर्मावर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यालयातील सीसीटीव्ही आणि डीव्हीआर बंद केल्याचंही समोर आलं आहे. आता पोलिसांची शेवटची आशा सर्व्हर कंपनीकडून आहे, त्यामुळे जबलपूर पोलिसांनी सीसीटीव्हीशी संबंधित सर्व्हर कंपनीला पत्रही पाठवले आहे.या हत्याकांडावरून विरोधी पक्ष काँग्रेस भाजप सरकारवर हल्लाबोल करत आहे. काँग्रेस पक्षाचे मीडिया हेड के.के. मिश्रा म्हणाले, ‘गेल्या आठवड्यात मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की, मुलींवर वाईट नजर टाकणाऱ्यांना जमिनीत गाडलं जाईल. मला हे जाणून घ्यायचं आहे की ज्याने या तरुणीची हत्या केली त्याला तुम्ही आणि तुमच्या पक्षाचे संरक्षण का मिळत आहे?’
बुलडोझरने त्याचे घर का पाडले नाही, असा सवालही त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना केला. ‘बुलडोझरचे डिझेल संपले आहे का? तसं असेल तर त्यात डिझेल टाकण्याची काँग्रेस पक्षाची तयारी आहे. मध्य प्रदेशात दुहेरी कायदा का सुरू आहे?’ असे अनेक प्रश्न के.के. मिश्रांनी उपस्थित केले आहेत.