• Wed. Apr 30th, 2025

पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हल्ला

Byjantaadmin

Jun 27, 2023
पुण्यात काही दिवसांपूर्वी दर्शना पवार नावाच्या तरुणीची हत्या झाली. या घटनेला जास्त दिवस झाले नाहीत तोच परत एकदा एका तरुणीवर हल्ला झाला. यावेळी पुण्याच्या सदाशिव पेठेत धक्कादायक घटना घडली. एमपीएससीची तयारी करत असलेल्या तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने हा हल्ला केला होता. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे. जखमी तरुणीवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
Pune Crime News : पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर कोयत्याने वार, एकतर्फी प्रेमातून हल्ला
वर्दळीचे ठिकाण अशी सदाशिव पेठेची ओळख आहे. या पेठेतील एका रस्त्यावर एकतर्फी प्रेमातून तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. कोयत्याचा वार लागल्यामुळे जखमी झालेली तरुणी पळत सुटली. तरुणी धावत असल्याचे बघून तिच्या मागे पळत तरुणाने पाठलाग केला. तो वारंवार कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न करू लागला. हा धक्कादायक प्रकार सुरू असताना एका तरुणाने धाडस केले. तो पुढे सरसावला. या तरुणाने एक-दोन जणांच्या मदतीने हल्लेखोराला पकडले आणि तरुणीवर वार करण्यापासून रोखले. यानंतर जखमी तरुणी स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्या दिशेला पळत गेली. तोपर्यंत आणखी काही जण पुढे आले आणि हल्लेखोराला चोप देण्यात आला. अज्ञाताने पोलिसांना माहिती दिली. पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी तातडीने हल्लेखोराला अटक केली.सुरुवातीला अनेकांनी बघ्याची भूमिका घेतली होती. पण एका तरुणाने हल्लेखोराच्या हातातील कोयता हिसकावला म्हणून मुलगी वाचली नाही तर भलतेच घडले असते अशी प्रतिक्रिया तरुणीच्या आईने मीडिया प्रतिनिधींकडे दिली. हल्लेखोर तरुण मागील काही दिवसांपासून सातत्याने माझ्या मुलीला त्रास देत होता. पाठलाग करत होता… धमक्या देत होता; असे तरुणीच्या आईने सांगितले.

पुण्यासारख्या शिक्षणाचे माहेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरात भर दिवसा तरुणीवर हल्ला झाला. यामुळे महिला सुरक्षेच्या प्रश्नावर उघडपणे चर्चा सुरू झाली आहे. घरातून बाहेर निघालेल्या मुली घरी येतपर्यंत मनाला घोर लागलेला असतो. त्यामुळे मुली कधी सुरक्षित होणार? असा प्रश्न सामान्य पुणेकर उपस्थित करू लागले आहेत.
लेशपाल जवळगेमुळे वाचला तरुणीचा जीव
लेशपाल जवळगे या सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आढेगावच्या तरुणाने तरुणीचा जीव वाचवला. त्यानेच हल्लेखोराला सर्वात आधी पकडले आणि त्याच्या हातून कोयता काढून घेतला. लेशपाल पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याच्या निमित्ताने वास्तव्यास आहे. तो अभ्यास संपवून राहण्याच्या ठिकाणी जात होता, त्यावेळी रस्त्यात तरुणी पळत असल्याचे त्याने बघितले. पाठोपाठ एकजण कोयता हाती घेऊन धावत होता. हे बघून लेशपालने धाडस केले आणि हल्लेखोराला पकडून तरुणीला वाचवले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed