• Wed. Apr 30th, 2025

शाळापूर्व तयारी व विद्यार्थी लाभांच्या योजनांचा जागर कार्यशाळा उत्साहात

Byjantaadmin

Jun 27, 2023
शाळापूर्व तयारी व विद्यार्थी लाभांच्या योजनांचा जागर कार्यशाळा उत्साहात
लातूर : शाळापूर्व तयारी व विद्यार्थी लाभांच्या योजनांचा जागर या दोन्ही विषयाबाबत दयानंद शिक्षण संस्था सभागृहात दि. २६ जून रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३ या वेळेत जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक ६०० मुख्याध्यापकांची कार्यशाळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
या कार्यशाळेस औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, ‘डायट’च्या प्राचार्य डॉ. भागीरथी गिरी, सहाय्यक शिक्षण संचालक दत्तात्रय मठपती, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागेश मापारी, उपशिक्षणाधिकारी अरुणा काळे, उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तथा लातूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख, मुख्याध्यापक संघाचे सचिव बजरंग चोले, दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.
अशा कार्यशाळेस मुख्याध्यापकांना प्रतिनीधी न पाठवता स्वतः उपस्थित राहणे, प्रत्येक मुख्याध्यापकाने सेनापतीप्रमाणे कार्य करून पटसंख्या वाढविणे व शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी स्वतःला झोकून देवून काम करावे. मुख्याध्यापक संघाने परीक्षा मंडळाचे उत्कृष्ट नियोजन केले असून लवकरच वार्षिक मूल्यमापन पुस्तिका सर्व शाळांपर्यंत पोहोचेल. तरी जिल्ह्यातील सर्व शाळांनी यात सहभागी होण्याचे आवाहन यावेळी आमदार काळे यांनी केले. तसेच पालक गुणवत्ता पाहुनच आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेतात. त्यामुळे गुणवत्तेला पर्याय नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिक्षणाधिकारी मापारी यांनी सर्व मुख्याध्यापकांना शाळापूर्व तयारीबाबत सूचना दिल्या. ते म्हणाले की, सर्वांनी पहिल्याच दिवशी वार्षिक नियोजन व कार्यवाही करणे अपेक्षित असते, ती करावी. ‘उस्मानाबाद पॅटर्न’प्रमाणे १० वी व १२ वी बोर्ड परीक्षांना पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या शाळा बदलून केल्या जाणार आहेत. त्यामुळे तो ‘पॅटर्न’ राज्यभर राबविला जाईल. त्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व मुख्याध्यापकांनी नियोजन व कार्यवाही करावी तसेच ‘सुपर ५०’ संदर्भातील स्पर्धा परीक्षा तयारीबाबत जिल्हास्तरावरील नियोजनाप्रमाणे कार्यवाही करावी व स्पर्धा परीक्षेच्या तयारीमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी करावेत, असे सांगितले.
यावेळी डॉ. गिरी यांनी, नवीन शैक्षणिक धोरण -२०२० संदर्भात व ‘सुपर ५०’ संदर्भात सर्व मुख्याध्यापकांना विस्तृत मार्गदर्शन केले. उपशिक्षणाधिकारी काळे यांनी शिक्षण संचालनालय (योजना), महाराष्ट्र पुणे यांच्याकडील सर्व विद्यार्थी लाभाच्या योजनांची विस्तृत स्वरुपात सर्व मुख्याध्यापकांना माहिती दिली. उपशिक्षणाधिकारी अंधारे यांनी प्रभावी व समयोचित मागदर्शन करून विद्यार्थी गुणवत्तेसाठी अतिशय तळमळीने काम करण्याचे आवाहन केले. सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कालिदास शेळके यांनी शेवटी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *