• Sun. Aug 17th, 2025

‘जी-२०’ शिक्षण कार्यगट प्रतिनिधींचा आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग

Byjantaadmin

Jun 21, 2023

पुणे, दि. २१: ‘जी- २०’ अंतर्गत शिक्षण कार्यगटाच्या चौथ्या बैठकीसाठी आलेल्या प्रतिनिधींनी केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे आयोजित अंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी केंद्रीय उच्च शिक्षण सचिव के. संजय मूर्ती, शालेय शिक्षण सचिव संजय कुमार,  विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुरेश गोसावी उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांसह परदेशी पाहुण्यांनी यावेळी आयोजित योगवर्गात सहभाग घेतला. प्राणायाम, ताडासन, वृक्षासन, शिथिल दंडासन, भद्रासन, वज्रासन, उत्तान मंडुकासन, भुजंगासन, शलभासन, पवनमुक्तासन, सेतूबंधासन आदी विविध प्रकारची आसने यावेळी करण्यात आली.

कुलगुरू प्रा.गोसावी यांनी प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत केले. योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद आणि डॉ. विश्वनाथ पिसे यांनी उपस्थितांना योगासनाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी युवकांनी योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. परदेशी प्रतिनिधींनी ही प्रात्यक्षिके आपल्या मोबाईलमध्ये टिपून घेण्यासोबत योगशास्त्राची माहिती अत्यंत लक्षपूर्वक जाणून घेतली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *