• Thu. Aug 21st, 2025

कितीही चर्चा होऊद्या, एकाही मंत्र्याचा राजीनामा घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आमदारांना आश्वासन

Byjantaadmin

Jun 14, 2023

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रतेवर काही दिवसांपूर्वीच सुप्रीम कोर्टातून निकाल आला आहे. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा केली. त्यानंतर शिंदे गटातील पाच मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या, सत्तांतर झाल्यापासून मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि गुलाबराव पाटील हे कोणत्या ना कोणत्या वादात अडकल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं या मंत्र्यांच्या जागी नव्या आमदारांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देत चर्चांना पूर्णविराम दिला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जम्मू-काश्मिर दौऱ्यावरून मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांनी पक्षातील प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. त्यावेळी कार्यकर्ते, आमदार, नेते आणि अनेक मंत्री उपस्थित होते. त्यात त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावेळी कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून नव्या लोकांना संधी दिली जाणार असल्याचंही आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील आमदार आणि खासदारांना दिल्याचं समजतं. त्यामुळं आता डेंजर झोनमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या मंत्र्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळं आता मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या विस्तारात शिंदे गटाकडून कोणत्या आमदारांचा समावेश होणार, याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

शिंदे गटाचे आमदार आणि मंत्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं भाजपची इमेज खराब होत असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यामुळं केंद्रीय भाजप नेत्यांनी शिंदे गटातील मंत्री अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील, दीपक केसरकर, संदीपान भुमरे आणि तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डच्चू देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांना केल्याचा दावा करण्यात आला होता. परंतु आता कोणत्याही मंत्र्याचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *