महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून राज्यातील सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारवर सातत्यानं टीकेची झोड उठवली जात असते. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे तर भाजपवर हल्लाबोल करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यांनी आता आम्ही सर्व निवडणुका एकत्रच लढविणार असून महाराष्ट्र हा भाजपमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आळंदीत झालेल्या वारकऱ्यांवरील लाठीमारासह विविध मुद्द्यांवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. पटोले म्हणाले, राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही माऊलींचा आदर करत त्याचा सन्मान केला होता. तर सध्याचे सरकार मात्र जाणीवपूर्वक याविरोधात वर्तन करत आहे अशी टीका पटोले यांनी केली आहे.
भाजपनं आपली खरी वृत्ती दाखवली…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली. तसेच महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवण्याचा काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.
कर्नाटकप्रमाणेच महाराष्ट्रातही बदल…
ज्याप्रमाणे कर्नाटकात congress ने बाजी मारली आहे, तसाच परिणाम आता महाराष्ट्रातही दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केले. भाजपवर टीका करताना त्यांनी भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रच निवडणुका लढविणार असल्याचे संकेतही पटोले यांनी यावेळी दिले.