• Mon. Aug 18th, 2025

बर्निंग बसचा थरार, वीस मिनिटांत एसटी जळून खाक

Byjantaadmin

Jun 12, 2023

बसमध्ये आग लागल्याने घाबरलेल्या प्रवाशांनी खिडकीतून खाली उड्या टाकल्या. याशिवाय वेळीच सर्वांना खाली उतरवण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.

राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या तापमानात वाढ झालेली असल्याने आग लागल्याच्या घटना समोर येत आहे. मुंबई तसेच पुणे शहरात इमारतींना आग लागल्याच्या घटना ताज्या असतानाच आता पुणे-बंगळुरु महामार्गावर एसटी बसला भीषण आग लागल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. साताऱ्याहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या विठाई बसला आनेवाडी टोल नाक्याजवळ भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर बसमधील प्रवासांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. परंतु बस केवळ पंधरा मिनिटांत जळून खाक झाली आहे. त्यामुळं आता अपघातग्रस्त बसच्या चालक आणि वाहकाने दाखवलेल्या प्रसंगावधानतेमुळं मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरातील राधानगरी डेपोतून स्वारगेटच्या दिशेने निघालेल्या विठाई एसटी बसला आनेवाडी टोल नाक्यावर भीषण आग लागली. इंजिनमधून धूर येत असल्याचं दिसताच चालकाने तात्काळ बस थांबवून वाहकाच्या मदतीने सर्व प्रवाशांना खाली उतरवलं. यावेळी अनेकांनी खिडक्या तोडून खाली उड्या मारत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. प्रवासी खाली उतरल्याने केवळ दहा ते पंधरा मिनिटांत संपूर्ण एसटी बस जळून खाक झाली. यावेळी पुणे-बंगळुरु महामार्गावर धुराचे लोट पसरल्याने मोठी वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी वाई नगरपालिका आणि एका साखर कारखान्यातील अग्निशमन दलाच्या गाड्या बोलावल्या आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांत आग विझवली असून दुर्घटनाग्रस्त एसटी बस महामार्गावरून बाजूला हटवण्यात आली आहे. तसेच वाहतूक सुरळीत करण्यात आल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या एसटी बसने पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आल्याची माहिती आहे.

 

pune bangalore national highway

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *