स्थळ… पुण्यातील रास्ता पेठ. दिवाळीनिमित्तचा सगर कार्यक्रम. भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती आणि मागे गाणे सुरू होते, ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ ऐकायला आणि पचायला थोडा अवघड वाटणारा प्रसंगांचा हा योगायोग मात्र प्रत्यक्षात घडला आहे.
एन्ट्रीलाच ‘राष्ट्रवादी पुन्हा’
कार्यक्रमात भाजपच्या नेत्याची एन्ट्री अन गाणे मात्र राष्ट्रवादीचे हे कसे काय असा प्रश्न सर्वांनाच पडला. पण ही करामत होती डीजेची. चंद्रकांत पाटलांच्या एन्ट्रीला त्याने हे गाणे वाजवले होते. यावेळी उपस्थितही गोंधळून गेले होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावरील भाव बरेच काही सांगून गेले. डीजेवर सुरू असलेल्या ‘राष्ट्रवादी पुन्हा’च्या आवाजावर कसलिही प्रतिक्रिया न देता चंद्रकांत पाटील तिथून निघून गेले. पण नंतर मात्र डीजे चालकाला ताब्यात घेण्यात आले.
पाटलांनी घेतला काढता पाय
त्याचे झाले असे की, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यात एका कार्यक्रमात सहभागी झाले असता त्यांच्यासमोरच डीजेवर ‘राष्ट्रवादी पुन्हा…’ हे गाणे वाजवण्यात आले. चंद्रकांत पाटील हे पुण्यात दिवाळीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना भेट देत होते. यावेळी ते रास्ता पेठेतील सगर कार्यक्रमाला भेट देण्यासाठी तिथे दाखल झाले होते. यावेळी त्या ठिकाणी आधीच उपस्थित असलेल्या एका डीजेवर डीजे चालकाने ‘राष्ट्रवादी पुन्हा’ हे गाणे वाजवले. चंद्रकांत पाटील गर्दीतून जात असताना त्यांच्या पाठीमागे वाजणाऱ्या राष्ट्रवादी पुन्हा या गाण्यामुळे उपस्थितांमध्येही थोडा वेळ गोंधळ निर्माण झाला होता. मात्र चंद्रकांत पाटील यांनी काहीही प्रतिक्रिया न देता तिथून काढता पाय घेतला.
डीजे चालकावर गुन्हा
दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी डीजे चालकाला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ध्वनीक्षेपकासाठी परवानगी नसल्याबद्दल त्याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.