मुंबई : भारतीय हवामान विभागानं यंदाच्या मान्सूनसंदर्भात मोठी अपडेट दिली आहे. मान्सूनचं आजचं केरळमध्ये आगमन झालं असल्याचं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे. दरवर्षी १ जून रोजी मान्सूनचं आगमन केरळमध्ये होतं, यंदा तब्बल ७ दिवस उशिरानं मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज, ८जून २०२३ रोजी प्रवेश केला आहे. मान्सूनची वाटचाल दक्षिण अरबी समुद्र आणि मध्य अरबी समुद्र आणि लक्षद्वीप भागात सुरु आहे. केरळ, दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन भाग, मन्नारचे आखातात मान्सून दाखल झाला आहे. महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन १६ जूनला होईल असा अंदाज आहे.
मान्सून महाराष्ट्रात कधी दाखल होणार?
केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर महाराष्ट्रात पोहोचण्यासा साधारणपणे ७ दिवसांचा वेळ लागतो. त्या अंदाजानुसार आज मान्सून केरळमध्ये आल्यानं महाराष्ट्रात मान्सून १६ जून रोजी दाखल होईल दरम्यान, गेल्या १२ वर्षांचा अभ्यास केला असता केवळ एका वर्षीचं मान्सून महाराष्ट्रात ७ जूनच्या दरम्यान दाखल झाला होता. मान्सूनचा गेल्या १२ वर्षातील प्रवास पाहिला असता महाराष्ट्रात मृग नक्षत्राला मान्सून दाखल होतो हे समीकरण बदललं असल्याचं दिसून येत. मान्सून आज दाखल झाल्यानं केंद्र सरकार समोरील देखील चिंता दूर झाली आहे.