शिवराज्याभिषेक दिनी सात तरुणांकडून आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर कोल्हापूरमध्ये हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. याच धर्तीवर कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी संघटनांकडून पुकारण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जसह अश्रूधुराच्या नळकांड्या देखील फोडाव्या लागल्या. तसेच कोल्हापुरातील इंटरनेट सेवाही खंडित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता या हिंसाचारावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया देतानाच गंभीर आरोप केला आहे.
अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोल्हापुरातील राड्यावर कठोर शब्दांत भाष्य केलं. पवार म्हणाले, कोल्हापूर हे शांतताप्रिय शहर असून येथे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच हा राडा, दंगली हाताळण्यासाठी पोलिसांना फ्री हँड द्यावा. त्यांच्या कामात राजकीय हस्तक्षेप करू नये. समाजकंटकांवर कारवाई करण्यास पोलीस सक्षम आहेत असेही पवार म्हणाले.
निवडणुका समोर ठेऊन…
कोल्हापू )मध्ये जो राडा झाला, त्यासाठी कोण जबाबदार आहे याचा सरकारने शोध घेतला पाहिजे अशी मागणी अजित पवार यांनी केली. तसेच निवडणूका समोर ठेऊन राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.
कठोर कारवाई व्हावी…
अफवा पसरवून दंगल घडवण्याचा घाट घातला जात आहे असा आरोपही त्यांनी केला.तसेच हे आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवले, त्याची सखोल चौकशी व्हावी. ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरीही त्यात हस्तक्षेप न करता कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली. तसेच हे आक्षेपार्ह स्टेटस कोणी ठेवले, त्याची सखोल चौकशी व्हावी. ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची असली तरीही त्यात हस्तक्षेप न करता कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.
कोल्हापुरात नेमकं काय घडलं?
कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आक्षेपार्ह स्टेट्सवरून आक्रमक झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी(दि.७) कोल्हापूर बंदची हाक दिली होती. त्यानंतर या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी विराट मोर्चाही काढण्यात आला. मात्र, पोलिसांचा जमावबंदीचा आदेश झुगारून हा मोर्चा काढण्यात आला होता.
यावेळी हजारो लोक मोर्चात सहभागी झाले होते. हा मोर्चा सुरू असतानाच आंदोलकांना पोलिसांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. मात्र, हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी अखेर या मोर्चावर लाठीमार केला. पोलिसांच्या लाठीमारामुळे एकच गोंधळ उडाला. जमाव ऐकत नव्हता म्हणून पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.