• Thu. May 1st, 2025

तिरुपती श्री बालाजीचे दर्शन आता महाराष्ट्रातूनही घेता येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Byjantaadmin

Jun 7, 2023

अलिबाग,दि.७ (जिमाका): सर्वांना आनंद देणारा हा भूमिपूजन सोहळा असून आजचा दिवस सर्वांसाठी मंगलमय आहे. ज्यांना प्रत्यक्ष तिरुपती येथे जाऊन श्री बालाजीचे दर्शन घेणे शक्य नाही त्यांना येथे होणाऱ्या मंदिरामुळे दर्शन घेता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उलवे ता. उरण येथे केले.

उलवे, सेक्टर १२, नवी मुंबई येथे दहा एकर परिसरात साकारण्यात येणाऱ्या तिरूमला तिरुपती देवस्थानाच्या श्री वेंकटेश्वरा स्वामी वारी मंदिराचे भूमिपूजन मुख्यमंत्री श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे, डॉ. श्रीकांत शिंदे, सर्वश्री आमदार भरत गोगावले, महेंद्र थोरवे, महेश बालदी, प्रसिद्ध उद्योजक रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया, तिरूमला देवस्थानचे अध्यक्ष वाय.व्ही. सुब्बा रेड्डी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, तिरुमला ट्रस्टचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

भूमिपूजन समारंभानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत म्हटले की, सर्वांना आनंद देणारा हा सोहळा असून संपूर्ण महाराष्ट्रासाठी आजचा दिवस मंगलमय आणि गौरवशाली आहे. प्रत्येकालाच आंध्र प्रदेशात जावून तिरुपती श्री बालाजीचे प्रत्यक्ष दर्शन घेणे शक्य होत नाही. अशा सर्वांना येथे तिरुपती श्री बालाजीचे दर्शन होणार आहे. हे मंदिर साकारण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.

महाराष्ट्रात तिरुपती श्री बालाजीचे मंदिर साकारत असल्याबद्दल तिरूमला ट्रस्टचे तसेच या पवित्र कामात ज्यांचे सहकार्य लाभले आहे, त्या सर्वांचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आभार मानले. यावेळी तिरूमला ट्रस्टचे अध्यक्ष श्री. रेड्डी यांनी हे मंदिर कशा पद्धतीने साकारण्यात येणार आहे त्याविषयीची माहिती सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *