• Wed. Apr 30th, 2025

“मी उद्धव ठाकरेंसोबतच थांबायचं ठरवलं होतं, पण…”,

Byjantaadmin

Jun 5, 2023

जवळपास वर्षभरापूर्वी तत्कालीन शिवसेनेत मोठा राजकीय स्फोट झाला आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आणि नंतर मागून शिवसेनेतील तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार बाहेर पडले. शिंदेंच्या नेतृत्वाखाली या गटाने भाजपाशी हातमिळवणी केली आणि राज्यातलं ठाकरे सरकार गडगडलं. यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली राज्यात नवीन सरकार अस्तित्वात आलं. यासंदर्भात गेल्या वर्षभरात अनेक चर्चा, दावे-प्रतिदावे, राजकीय वाद, न्यायालयीन लढा, निकाल असं सारंकाही झालं. आता शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे.

sanjay rathod uddhav thackeray eknath shinde

काय म्हणाले संजय राठोड?

संजय राठोड यांनी रविवारी दुपारी बंजारा समाजाच्या एका मेळाव्यात बोलताना महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात नेमकं काय घडलं? याबाबत खुलासा केला आहे. संजय राठोड हे आधी शिंदे गटाबरोबर बाहेर पडले नव्हते. शिंदे गट गुवाहाटीत पोहोचल्यानंतरही राठोड यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच संजय राठोडही शिंदे गटात दाखल झाल्याचं स्पष्ट झालं. यासंदर्भात राठोड यांनी मेळाव्यात खुलासा केला आहे.“मी ठरवलं होतं की आपण उद्धव ठाकरेंसोबतच राहायचं. मी तिकडे (शिंदे गट) गेलो नाही. पण नंतर अचानक मला आपले धर्मगुरू महंत बाबूसिंह महाराज यांचा फोन आला. महंत जितेंद्र महाराज यांचाही फोन आला. आपल्या सगळ्या महंतांचे फोन आले. समाजातल्या अनेक नेत्यांचे फोन आले. त्यांनी मला सांगितलं की तू ज्यांच्याबरोबर आहेस, ते काही आता सत्तेत येणार नाहीत. पोहरादेवीचा विकास, समाजाचे प्रश्न सोडवायचे असतील, तर तुला त्यांच्याबरोबर (शिंदे गट) जावं लागेल. त्यानंतर मला महंत बाबूसिंह महाराज यांनी परवानगी दिली आणि मग मीदेखील गुवाहाटीला निघून गेलो”, असं संजय राठोड म्हणाले.

महंत बाबूसिंह महाराज म्हणतात…

दरम्यान, संजय राठोड यांच्या या विधानाबाबत टीव्ही ९ शी बोलताना महंत बाबूसिंह महाराज आणि इतर महंतांनी भूमिका मांडली आहे. “आम्ही समाजाचे धर्मगुरू आहोत. सर्वपक्षीय, सर्व जात आमच्यासाठी समान आहेत. आम्ही कोणत्याही समाजाला आशीर्वाद देऊ शकतो”, असं ते म्हणाले.“ज्यावेळी हे झालं, तेव्हा संजय राठोड यांनी आम्हा सर्वांना फोन केला होता. त्यानंतर आम्ही आशीर्वादरूपी त्यांना सांगितलं की आता कुणी उरलेलं नाही. सगळे शिंदेंबरोबर गेले आहेत. समाजाचे काही प्रश्न आहेत. ते सोडवण्यासाठी तुम्ही योग्य निर्णय घ्या. आमचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी राहील”, अशी प्रतिक्रियाही महंतांकडून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *