साधारण एक वर्षभरापूर्वी शिवसेना पक्ष फुटला. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना बरोबर घेत वेगळा गट स्थापन करून भाजपाबरोबर सत्तास्थापन केली. या घटनेला आता एक वर्ष उलटलं. तरी राज्यातल्या एकनाथ शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. परंतु अद्याप यावर कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (०४ जून) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीत शाह यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काही सूचना दिल्याचं बोललं जात आहे. याबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाचे मुख्य प्रतोद भरत गोगावले यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
भरत गोगावले म्हणाले की, काही वेगळ्या कारणास्तव एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी अमित शाह यांची भेट घेतली. तेव्हा मंत्रिमंडळाबाबतही चर्चा झाल्याचं कळतंय. परंतु अद्याप मला त्याची माहिती नाही कारण मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना भेटलो नाही. आज माझी त्यांच्याबरोबर भेट होणार आहे. दुपारी आमची भेट होईल. ही भेट झाल्यावर मी साहेबांना याबाबत विचारेन, मंत्रिमंडळ विस्ताराची काय तारीख ठरली आहे? गोगावले टीव्ही ९ मराठीशी बातचित करत होते.यावेळी भरत गोगावले यांना सध्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट होणार आहे का? त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर गोगावले म्हणाले, काही ठराविक लोकांसंदर्भात तसं असू शकतं. परंतु मी साहेबांशी (एकनाथ शिंदे) याबाबत चर्चा केलेली नाही. ते पहाटे चार वाजता दिल्लीवरून परत आले आहेत. आता ते एका बैठकीत व्यस्त आहेत. त्यानंतर आमची भेट होईल. तेव्हा मी त्यांना याबाबत विचारतो