राजस्थानातील काँग्रेसचे नेते सचिन पायलट हे आपल्याच काँग्रेस पक्षाविरोधात बंड झेंडा रोवणार का? पायलट नवीन पक्ष काढणार का? की पायलट भारतीय जनता पक्षासोबत जातील का? हे सर्व प्रश्न राजकारणात रस असणाऱ्या सर्वांच्या मनात निर्माण होऊ लागले आहेत. यासंदर्भात आता एका सर्व्हेची माहिती येत आहे.
राजस्थानमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील विरोध दिवसेंदिवस वाढत जात आहे. गेल्या काही दिवसांपासून राजस्थानच्या राजकीय विश्वातून पायलट आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला काही मोठी घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत एक सर्वेक्षणातून समोर आले आहे.सी-व्होटरने आजतकसाठी एक सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात सचिन पायलटबाबत राजस्थानच्या लोकांना दोन प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा होता की, पायलट हे नवीन पक्ष काढणार का? तर दुसरा प्रश्न असा विचारण्यात आला की, पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार का? या दोन्ही प्रश्नांवर लोकांकडून उत्तरे मागवण्यात आली.
भाजपमध्ये जाणार?
या प्रश्नावर जी आकडेवारी समोर आली आहे ती धक्कादायक आहे. काँग्रेस समर्थकांपैकी 14 टक्के लोकांनी पायलट भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले. तर सुमारे 48 टक्के भाजप समर्थकांना विश्वास होता की पायलट भाजप पक्षात सामील होतील. राजस्थानमधील 35 टक्के सामान्य जनतेने पायलट काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
पायलट नवीन पक्ष काढणार?
या प्रश्नावर राजस्थानमधील 20 टक्के सामान्य लोकांनी होय असे उत्तर दिले, पायलट हे नवीन पक्ष काढणार असल्याचे सांगितले. तर 22 टक्के भाजप समर्थकांनी याला सहमती दर्शवली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पायलट हे नवीन पक्ष काढणार असल्याचेही सुमारे 17 टक्के कॉंग्रेस समर्थकांनी सांगितले.
मुख्य म्हणजे मुख्यमंत्री गेहलोत आणि पायलट यांच्यातील दुरावा वाढत आहे. या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी काँग्रेस हायकमांडने अनेकदा प्रयत्न केले. सचिन पायलट हे ही मुख्यमंत्री गेहलोत यांना प्रश्न विचारत उपोषणाला बसले होते. पायलट यांनी सरकारविरोधात यात्राही काढली. दोन्ही नेत्यांमधील या नाराजीमुळे निवडणुकीत कोणतेही नुकसान होऊ नये, यासाठी यापूर्वी दिल्लीत एक महत्त्वाची बैठकही झाली होती. या बैठकीला काँग्रेस नेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल, मुख्यमंत्री गेहलोत व सचिन पायलट आदी उपस्थित होते.
हायकमांड सामंजस्याचा फॉर्म्युला घेऊन ही बैठक घेत असल्याचे मानले जात होते. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली असे मानले जात आहे. कारण बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी पायलट यांनी आपल्या मागण्यांशी तडजोड करणार नसल्याचे सांगितले होते.
सचिन पायलट यांची नाराजी केवळ गेहलोत यांच्यावरच असल्याचे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे. पायलट यांनीही आपण नेहमीच CONGRESS राहणार असल्याचे सांगितले आहे. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी पायलट यांची वाढती नाराजी अनेक संकेत देत आहे. मात्र, अद्याप त्यांच्याकडून कोणतेही वक्तव्य आलेले नाही. आता सचिन पायलट हे आगामी काळात काय करतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.