• Wed. Apr 30th, 2025

जागतिक सायकल दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या आयएमएच्या सायकल रॅलीस लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद 

Byjantaadmin

Jun 3, 2023
जागतिक सायकल दिवसाचे औचित्य साधून काढण्यात आलेल्या आयएमएच्या सायकल रॅलीस लातुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
 लातूर : जागतिक सायकल दिवसाचे औचित्य साधून लातूर आयएमएच्या वतीने शनिवारी लातुरात काढण्यात आलेल्या सायकल रॅलीस अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वच वयोगटातील सायकलस्वारांनी यामध्ये आपला ऐच्छिक सहभाग नोंदवला. पर्यावरणाचा समतोल साधण्यासोबतच स्वास्थसंवर्धनाच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
                         जिल्हा क्रीडा संकुलापासून शनिवारी सकाळी सहा वाजता या सायकल रॅलीस सुरुवात झाली. या रॅलीचे उद्घाटन शहर उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत फुंदे, राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहायक आयुक्त नागनाथ आयलाने  , आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार आदी मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. संपूर्ण जगात दि. ३ जून हा दिवस जागतिक सायकल दिवस म्हणून साजरा केला जातो. लातूर आयएमएच्या वतीने सातत्याने आरोग्य विषयक तसेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतात. सायकल चालविणे  हे आरोग्यदायी तसेच पर्यावरणपूरक देखील आहे. या उपक्रमाच्या अनुषंगाने नागरिकांना सायकल चालविण्यामुळे आरोग्याला होणारे फायदेही सांगण्यात आले.
 आजच्या धावपळीच्या युगात प्रत्येकाने आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देणे गरजेचे आहे.
 अशावेळी कोणत्या ना कोणत्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राहिलेच पाहिजे, या उदात्त हेतूने लातूर आयएमएच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. नागरिकांनी स्पर्धा न करता केवळ आपल्या स्वास्थास प्राधान्य द्यावे या उद्देशाने सायकल स्पर्धेऐवजी या उपक्रमास सायकल रॅली असे संबोधण्यात आले.
लातूर आयएमएने जागतिक तंबाखू विरोध दिवसाच्या अनुषंगाने दि. ३१ मे २०२३ रोजीही लोकांना व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते. आता सोमवारी, दि. ५ जून रोजीही जागतिक पर्यावरण दिवस आहे. त्यानिमित्ताने जागतिक सायकल दिवसाचे औचित्य साधून हे दोन्ही उपक्रम यशस्वी करण्याचे काम आयएमए ने केले आहे. या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंसाठी पिण्याच्या पाण्याची व अल्पोपहाराची व्यवस्था आयएमए तसेच मंदाडे हॉस्पिटल व एम. जे. हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आली होती. रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक सायकलपटूंना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
या रॅलीच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष डॉ. अनिल राठी, सचिव डॉ. आशिष चेपुरे, कोषाध्यक्ष डॉ. अर्जुन मंदाडे, उपाध्यक्ष डॉ. अशोक पोद्दार, महिला विंगच्या सचिव डॉ. प्रियंका  राठोड, डॉ. सुबोध सोमाणी, डॉ. ऋषिकेश हरिदास, डॉ. ब्रिजमोहन झंवर, डॉ. आरती झंवर, डॉ.अमीर शेख, डॉ. दत्तात्रय मंदाडे, डॉ. बालाजी कोंबडे, डॉ. प्रशांत कापसे, डॉ. विजय चिंचोलकर, डॉ. विमल डोळे, डॉ. वैशाली बहात्तरे , डॉ.अतिश कोमवाड , डॉ. अभिजित मुगळीकर, डॉ. योगेश पाटील  या आयएमए सदस्यांसह विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील मनोविकृतीशास्त्र विभागातील प्रशिक्षणार्थी डॉ.  निकिता वलसे , डॉ. सुनील काकडे, डॉ. मयुरी घुगे, डॉ. अतुल गंडले, डॉ. रुमान यांनी  परिश्रम घेतले. रॅलीत विकास कातपुरे , संजय मलवाडे, सुवर्णा पवार, कोमल शिंदे, संतोष कल्याणकर, आनंद कातपुरे , ऋषी खंदाडे, देवीज पफागीरे,  रणजित पानगावकर, दीपक केंद्रे, यथार्थ पाटील यासह विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन  डॉ. आशिष चेपुरे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. अर्जुन मंदाडे यांनी केले. रॅलीसाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम, शिवाजीनगरचे संजीवन मिरकले, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed