• Wed. Aug 6th, 2025

‘हनीट्रॅप’मध्ये अडकलेल्या डॉ.कुरुलकरांच्या जागी ‘डीआरडीओ’च्या संचालकपदी मकरंद जोशी

Byjantaadmin

Jun 2, 2023

‘डीआरडीओ’चे पूर्व संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. भारतीय संरक्षण क्षेत्रातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांना दिल्याप्रकरणी DRDO च्या डॉ. प्रदीप कुरुलकरांवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दहशतवादविरोधी पथक (एटीएस)ने त्यांना अटक केली आहे. सध्या त्यांची एटीएसकडून चौकशी सुरु असून आहे. त्यानंतर संचालकपदाची जागा अद्याप रिक्त होती. मात्र,आता त्यांच्याजागी डॉ. मकरंद जोशी यांची संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

DRDO News
डॉ. मकरंद जोशी यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या डीआरडीओ दिघे येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या संचालकपदाचा पदभार गुरुवारी (दि.१जून ) स्वीकारला. डॉ. जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट २००० मध्ये आर अँड डीई (अभियंता) या प्रयोगशाळेत रुजू झाले. आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यामध्ये त्यांनी विशेष योगदान दिला आहे.

‘आर अँड डीई’ची स्थापना सहा दशकांपूर्वी करण्यात आली असून ही एक प्रमुख अभियांत्रिकी प्रयोगशाळा आहे. याद्वारे भारतीय सशस्त्र दलांसाठी विविध अभियांत्रिकी प्रणालींच्या स्वदेशी विकासावर भर देण्यात येत आहे. या प्रयोगशाळेद्वारे लष्करासाठी लढाऊ अभियांत्रिकी प्रणाली ही विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्रिजिंग सिस्टीम, विस्फोटक प्रणाली, लाँचर्स आणि ग्राउंड सपोर्ट सिस्टम आदींचा यात समावेश आहे. संमिश्र उत्पादने, रोबोटिक प्रणाली आणि मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल-सिस्टम्स (एमईएमएस) विकसित करण्याच्या क्षेत्रात ही प्रयोगशाळा अग्रगण्य आहे.

कुरुलकरांवर हनीट्रॅपचं जाळं….

डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात हनीट्रॅपच जाळं टाकलं होतं. त्यासाठी लंडनमधील मोबाईल नंबरचा उपयोग करून प्रदीप कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकवरून संपर्क साधण्यात आला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीच नावं झारा दास गुप्ता असून ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचं सांगितलं. पुढे या दोघांमधला संवाद अतिशय खासगी पातळीवर पोहचला.

या संवादादरम्यान डॉ. प्रदीप कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत माहिती विचारली जाऊ लागली. एटीएसच्या तपासात कुरुलकरांसह गुप्तचर विभाग आणि हवाई दलाचा अधिकारीही अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य जप्त….

भारतीय ब्राम्होस आणि इतर क्षेपणास्त्रांची डिझाइन्स मागविण्यात आली. त्याचबरोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती. कुरुलकर ई-मेल मार्फत पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात होते, असं एटीएसच्या तपासात निष्पन्न झालं आहे. एटीएस(ATS)ने प्रदीप कुरुलकर यांचे जप्त केलेले मोबाईल, लॅपटॉप आणि इतर तांत्रिक साहित्य फॉरेन्सिक लॅबोरेटरीकडे तपासणीसाठी पाठवले होते. त्यातून ही बाब समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *