• Tue. Apr 29th, 2025

राष्ट्रवादीत चाललंय काय? शरद पवारांकडून बहिष्कार तर अजित पवारांकडून नव्या संसद भवनाचं तोंडभरून कौतुक

Byjantaadmin

May 30, 2023

पुणे 30 मे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी सोमवारी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनाचं कौतुक केलं. त्यांनी सर्व खासदारांना एकत्र येऊन देशातील सर्वसामान्यांसाठी काम करून त्यांचे प्रश्न सोडविण्याचा सल्ला दिला. यापूर्वी राष्ट्रवादीने उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना उद्घाटन कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याबद्दल पक्षप्रमुख शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

अजित पवारांकडून नव्या संसद भवनाचं तोंडभरून कौतुक

SHARAD PAWAR म्हणाले होते, मी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पाहिला. मी तिथे नव्हतो याचा मला आनंद आहे. तिथे जे घडलं त्याची मला काळजी वाटते. आपण देशाला मागे नेत आहोत का? मी ज्या सभागृहाचा सदस्य आहे त्या सभागृहाच्या अध्यक्षांनाही बोलावलं नाही. ज्यांच्या भाषणाने संसदेचं अधिवेशन सुरू होतं त्यांना निमंत्रित करण्यात आलं नव्हतं.

तर AJIT PAWAR नी मात्र याचं कौतुक केलं आहे. ते म्हणाले, की इंग्रजांनी आपली संसद (जुनी इमारत) बांधली हे आपल्या सर्वांना माहीत आहे. आता ज्या नवीन संसद भवनाचं उद्घाटन होत आहे, ते आपण स्वतः बांधलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर अनेक राज्यांनी स्वतःच्या विधानसभेच्या इमारती बांधल्या आहेत. महाराष्ट्राने 1980 नंतर विधानसभेची नवीन इमारतही बांधली आहे, परंतु सध्या महाराष्ट्रात नवीन विधानसभेची इमारत असावी, अशी चर्चा सुरू आहे.

जुन्या संसद भवनाच्या बांधकामासोबत देशातील सध्याच्या लोकसंख्येची तुलना करताना पवार म्हणाले की, वाढत्या लोकसंख्येबरोबर लोकप्रतिनिधीही वाढणार असून या नवीन इमारतीची गरज असल्याचं त्यांना व्यक्तिश: वाटत होतं. ते म्हणाले, देशाच्या लोकसंख्येचा विचार करता जुनी संसदेची इमारत बांधली गेली तेव्हा भारतात आपण 35 कोटी लोक होतो आणि आता 135 कोटी आहोत. हे पाहता आता लोकप्रतिनिधीही वाढणार आहेत. त्यामुळे या नव्या इमारतीची गरज होती असं मला व्यक्तिश: वाटतं.

ही इमारत विक्रमी वेळेत बांधण्यात आली आहे. कोविडच्या काळातही बांधकाम सुरू होतं आणि अखेर आपल्याला एक छान संसद भवन मिळालं आहे. आता या नवीन इमारतीत सर्वजण संविधानानुसार काम करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील. यामध्ये सर्वजण सहभागी होतील, असंही ते म्हणाले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed