नाशिक : रविवारी झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंती कार्यक्रमासाठी महाराष्ट्र भवन येथील सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही नेते ऊपस्थित होते. प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराने आश्चर्य व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे केलेले दुष्कृत्य हे अतिशय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली
विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सावरकरांची जयंती साजरी करत असताना महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्यात आले होते.या प्रकरणाचा छगन भुजबळ यांनी संताप व्यक्त केला आहे.
हीन मानसिकतेचं नवल वाटतंय- छगन भुजबळ
भुजबळ म्हणाले की, महाराष्ट्र सदनात झालेल्या विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती कार्यक्रमाला आमचा विरोध नाही. मात्र, या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र सदनात असलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटविण्याचे दुष्कृत्य करण्यात आले. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची देखील उपस्थिती होती हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.