कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. यामध्ये शनिवारी 24 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता मंत्रिमंडळात मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह एकूण 34 मंत्री आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले ज्येष्ठ नेते जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सवदी यांना मंत्री करण्यात आलेले नाही.
दिल्लीत तीन दिवस चाललेल्या बैठकीत मंत्र्यांची नावे निश्चित करण्यात आली होती. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनीही सहभाग घेतला. प्रत्येक नावाची निवड जात, समुदाय आणि प्रदेशाच्या आधारे करण्यात आली आहे. याचे कारण पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका आहेत. कर्नाटकात लोकसभेच्या 28 जागा आहेत. यापैकी किमान 20 जागा जिंकण्याचे लक्ष्यcongress ठेवले आहे.कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या पदासाठी आणि डी. के. शिवकुमार यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा रंगली होती. त्यानंतर काँग्रेसने तोडगा काढत, सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केले. मात्र, आता मंत्रिमंडळ विस्तारातही काँग्रेसने दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना संधी देत समतोल राखला आहे.
लिंगायत समाजातील 6 आमदारांना मंत्री करण्यात आले आहे. तसेच वोक्कलिगा समाजातील 4 आमदारांना मंत्री करण्यात आले. दलित समाजातील तीन जणांना मंत्रिमंडळात संधी देण्यात आली आहे. तर एसटीमधून दोन आणि ओबीसीमधून पाच मंत्री करण्यात आले आहेत.कुरुबा, राजू, मराठा आणि मोगवीरा समाजातील प्रत्येकी एक मंत्री आहे. सहा वेळा आमदार राहिलेले दिनेश गुंडू राव यांना ब्राह्मण चेहरा म्हणून संधी देण्यात आली आहे. मंत्रिमंडळात लक्ष्मी हेबाळकर या एकमेव महिला मंत्री आहेत. मुस्लिम समाजातील रहीम खान आणि बी. झेड. जमीर अहमद खान यांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे.केजे जॉर्ज हे ख्रिश्चन समुदायातून मंत्री झाले आहेत. 7 मंत्री जुने म्हैसूर मधली आहेत. 6 कित्तूर कर्नाटक आणि 2 मध्य कर्नाटकातील आहेत. लक्ष्मी हेबाळकर, मधु बंगारप्पा, डी सुधाकर, चेलुवराय स्वामी, मनकुल वैद्य, एमसी सुधाकर हे डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्या जवळचे मानले जातात. आता मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह वोक्कलिगा समाजाचे ५ मंत्री आणि लिंगायत समाजाचे ८ मंत्री आहेत.