दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू रविवारी नव्या संसदेपुढे होणाऱ्या महिला महापंचायतीत सहभागी होणार आहेत. या महापंचायतीला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. नव्या संसद भवनाकडे जाताना कुस्तीपटूंनी बॅरिकेड्सवरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी काहीशी बाचाबाची झाली. त्यानंतर काही पैलवानांना ताब्यात घेण्यात आले.कुस्तीपटू बजरंग पुनिया म्हणाला- ही लोकशाही आहे का? आम्ही शांततेl आंदोलन करत आहोत. आम्हाला अशी वागणूक दिली जात आहे. आम्हाला गोळ्या घाला. साक्षी मलिकलाही ताब्यात घेण्यात आल्याचे पुनियाने सांगितले.हरियाणा, यूपी व पंजाबसह अनेक राज्यांतील शेतकरी महापंचायतीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी सिंघू व टिकरी सीमेवर बॅरिकेड उभे केलेत. दिल्लीतील दोन मेट्रो स्थानकांचे सर्व प्रवेश व बाहेर पडण्याचे मार्ग बंद करण्यात आलेत. सिंघू सीमेवरील एका शाळेत तात्पुरता तुरुंग बनवण्यात आला आहे.
हरियाणा पोलिसांनी खाप व शेतकरी नेत्यांना ताब्यात घेतले
दुपारी नव्या संसदेपुढे महिला महापंचायत होणार आहे. शेतकरी नेते कुलदीप खरार म्हणाले की, बृजभूषणला अटक होत नाही तोपर्यंत हरियाणातील सर्व टोलनाके फ्री करण्यात आलेत.हरियाणा पोलिसांनी रविवारी सकाळपासूनच शेतकरी व महिलांना घेराव घालण्यास सुरुवात केली. हिसार, सोनीपत, पानिपत, रोहतक, जिंद व अंबाला येथे खाप प्रतिनिधी व शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.अंबाला येथे शेतकऱ्यांची पोलिसांशी झटापट झाली. रोहतकच्या सांपला येथे पोलिसांनी महिलांना बळजबरीने उचलून ताब्यात घेतले. अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. हरियाणातील सर्व टोलनाक्यांवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महापंचायतीकडे जाणाऱ्यांना ताब्यात घेतले जात आहे.
मोठे अपडेट्स…
- नव्या संसद भवनाबाहेर महिला महापंचायतीची घोषणा झाल्यानंतर सिंघू सीमेवर पोलिस तैनात करण्यात आलेत. सीमेवर पोलिसांच्या 4 कंपन्या तैनात करण्यात आल्या असून त्यात एका महिला प्लाटूनचा समावेश आहे. येथून ताब्यात घेतलेल्या सर्व लोकांना कांजवाला येथील प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात पाठवले जाईल.
- केंद्रीय सचिवालय आणि उद्योग भवन मेट्रो स्थानकांचे सर्व प्रवेश आणि निर्गमन दरवाजे प्रवाशांच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. मात्र, केंद्रीय सचिवालयात इंटरचेंजची सुविधा उपलब्ध आहे. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रविवारी ट्विट करून ही माहिती दिली.
- शेतकऱ्यांचे जत्थे दिल्लीत पोहोचत आहेत. पंजाब व राजस्थानातून प्रत्येकी एक जत्था दिल्लीत पोहोचला आहे.
हरियाणा-यूपी-पंजाबसह 5 राज्यांतील शेतकरी महिला महापंचायतीत जमणार आहेत.भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी ही महापंचायत आयोजित करण्यात आली आहे. कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया व साक्षी मलिक 23 एप्रिलपासून बृजभूषण यांच्या अटकेसाठी जंतरमंतरवर आंदोलन करत आहेत. महिला महापंचायतीत हरियाणाशिवाय यूपी, राजस्थान, उत्तराखंड, पंजाब व दिल्ली येथील खापांचे लोक व शेतकरी सहभागी होणार आहेत
महिला महापंचायतीवरील पोलिसांच्या कारवाईचे फोटो…




हरियाणा पोलिसांच्या कारवाईवर पैलवान काय म्हणाले?
विनेश फोगाट म्हणाली – आज भारताच्या इतिहासात एक नवी गोष्ट नोंदवली जाणार आहे. त्यासाठी मी संपूर्ण देशातील जनतेचे अभिनंदन करू इच्छिते. देशातील मुलींच्या सन्मानाला पायदळी तुडवून पंतप्रधानांच्या हस्ते संसद भवनाचे उद्घाटन केले जात आहे.
साक्षी मलिक म्हणाली – महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ आलेल्या सर्व महिला व शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकीकडे पंतप्रधान संसद भवनाचे उद्घाटन करत आहेत, तर दुसरीकडे लोकशाहीची हत्या केली जात आहे. हे पूर्णपणे असह्य आहे. आमच्या लोकांना अटक करू नये. त्यांची सुटका करा. मुलींच्या लढाईसाठी ते एकत्र येत आहेत. सर्व खाप पंचायतींना आवाहन आहे की, आज सर्व टोलनाके खुले करावेत.
बजरंग पुनिया म्हणाला- पोलिस आमची आणि आमच्या लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. बृजभूषण नामक गुन्हेगाराला अटक होत नाही, आमच्या लोकांना अटक केली जात आहे. पॉक्सो कायदा बदलण्याची भाषा करणारा बृजभूषण मोकाट फिरत आहे. आम्ही हात जोडून सर्वांसमोर उभे आहोत. आम्हाला अशी हीन वागणूक दिली जात आहे.
पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई सुरू केली
महापंचायतीसाठी हरियाणा-पंजाबमधून मोठ्या संख्येने शेतकरी पोहोचण्याची शक्यता असल्याने दिल्ली पोलिसांनी शनिवारी रात्रीच कारवाई केली. हरियाणा पोलिसांशीही संपर्क साधण्यात आला.त्यानंतर हरियाणात नवी दिल्लीला जाणाऱ्या महिला व शेतकऱ्यांची धरपकड सुरू झाली. पंजाबहून दिल्लीला जाणारा महिलांचा एक गट शनिवारी संध्याकाळी अंबाला येथील मंजी साहिब गुरुद्वारात पोहोचला तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. गुरुद्वाराच्या गेटवर पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेत.