• Wed. Apr 30th, 2025

अल्पावधीत  स्वकर्तृत्वावर राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारणारे विलासराव देशमुख असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी होते : संजय आवटे 

Byjantaadmin

May 28, 2023

अल्पावधीत  स्वकर्तृत्वावर राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारणारे विलासराव देशमुख असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी होते : संजय आवटे

लातूर : बाभळगाव सारख्या छोट्याश्या  गावच्या  सरपंचपदापासून  ते राज्याचा मुख्यमंत्री , केंद्रीय मंत्रिपदापर्यंत मजल मारणारे दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख हे असामान्य व्यक्तिमत्वाचे धनी होते, असे गौरवोदगार लोकमत पुणे चे संपादक संजय आवटे यांनी काढले.

             दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून ऊस उत्पादक शेतकरी मांजरा परिवाराच्या वतीने शुक्रवारी (  दि. २६ मे  )  सायंकाळी  लातूर शहरातील मार्केट यार्डातील दगडोजीराव देशमुख सभागृहात  ‘ लोकचळवळीतील समर्पित लोकनेता : विलासराव देशमुख ‘ या विषयावर  व्याख्यान देताना   संजय आवटे  बोलत होते.  या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी  माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख हे  होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन व  मान्यवरांच्या हस्ते दिवंगत लोकनेते विलासराव देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.  राजकारणातील अजातशत्रू व्यक्तिमत्व ही उपमाही  या लोकनेत्याला चपखल लागू पडते असे सांगून संजय आवटे पुढे म्हणाले की, राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ मानला  जातो. या अनिश्चिततेच्या खेळातही आपल्या धीरगंभीर नेतृत्वाने विलासरावांनी निश्चितता आणण्याचे काम केल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. म्हणून तर कोणतीही राजकीय कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना स्वकर्तृत्वाच्या बळावर हे नेतृत्व प्रगल्भ होत गेले. राजकारण म्हटले की शह – काटशह ओघाने आलेच. शह  – काटशहाच्या या खेळात आपल्या राजकीय चातुर्याच्या बळावर विलासरावांना नियतीने कायम मजबूत साथ दिली. म्हणून तर त्यांची राजकीय कारकीर्द सातत्याने बहरत  गेली. केवळ स्वपक्षीयच नव्हे तर विरोधकांनाही आपल्या वाक्चातुर्याच्या कौशल्यावर जिंकून घेण्याचे काम ते करत होते, ही बाब संपूर्ण राज्य – देशाने पाहिली  आहे. विविध जाती , धर्म, पंथाने नटलेल्या आपल्या  देशात धर्मनिरपेक्षतेस अनन्यसाधारण असे महत्व आहे.  त्याकरिता धर्मनिरपेक्ष भारताची संकल्पना अबाधित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांसह तरुणांनीही पुढे येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
                           महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण यांनी देशातील सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून पुरोगामी महाराष्ट्राची उभारणी केली होती. त्याचाच धागा पकडून विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राला कायम विकासाच्या अत्युच्च शिखरावर नेण्याचे काम केले. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर लोकांची नाडी  ओळखता आली पाहिजे. सामान्य लोकांची हीच नाडी  ओळखून सामान्यांना अपेक्षित असणारे विकासकार्य करून या महान नेत्याने सर्वसामान्यांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले आहे. सद्यस्थितीत २०१४ सालच्या आधीचा भारत आणि २०१४ नंतरचा भारत यादरम्यानचे अवलोकन केले असता सध्या वास्तव बाजूलाच सारून नको तो इतिहास पुढे आणला जात असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. सध्याच्या परिस्थितीत विलासराव देशमुखांसारख्या प्रगल्भ नेतृत्वाची राज्याला – देशाला नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
अध्यक्षीय समारोपात दिलीपराव देशमुख यांनी लातूरसारख्या ठिकाणी विचारांवर  विश्वास ठेवून चालणाऱ्या चळवळी ह्या जिवंत आहेत आणि म्हणूनच की काय, वैचारिक मेजवानीची  जणू लातूरकरांना या व्याख्यानाच्या  रूपाने पर्वणीच संयोजकांनी दिल्याचे बोलून दाखविले. याप्रसंगी शेतकरी संघटना आणि कारखानदारी यांचे  नाते अत्यंत पारदर्शिक असलेले आपल्या मिश्किल पद्धतीने विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी केले. प्रास्ताविकात राजेंद्र मोरे यांनी मांजरा साखर परिवार हा राज्यातील  पहिल्या पाच सर्वाधिक भाव देणाऱ्या कारखानदारीपैकी एक आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने दिलीपराव देशमुख यांचा विशेष गौरव करण्यात आला. मांजरा परिवाराने ऊस उत्पादकांना तब्बल २ हजार ९५१ रुपये एवढा भाव दिला आहे,असे सांगितले.   तसेच व्याख्यात्याचा परिचय राजीव कसबे यांनी करून दिला.
 सूत्रसंचालन  प्रा. पी.सी. पाटील  यांनी तर आभार प्रदर्शन सत्तार  पटेल यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  अरुणदादा  कुलकर्णी, राजीव कसबे, अशोक दहीफळे , नवनाथ शिंदे, नारायण नरखेडकर , भरत  पाटील, दगडू बरडे, प्रताप पाटील, माधव कवठाळे , प्रा. पी. सी. पाटील, डॉ. प्रभाकर भोसले , शितल  तम्मलवार , सचिन ढवण , सुरेश सूर्यवंशी , यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास आबासाहेब पाटील, श्रीपतराव काकडे, श्रीशैल्य उटगे , सर्जेराव मोरे, गणपतराव बाजूळगे, रवींद्र काळे, विजय देशमुख, अभय साळुंके, प्रवीण पाटील,  उदय देशमुख,  बालाजी बिराजदार, जगदीश बावणे, सुनील पडिले, सुरेश ढमाले, संजय जगताप, राजेश भोसले, बालाप्रसाद बिदादा, सुधीर गोजमगुंडे,  रविशंकर बरमदे , रेणाचे कार्यकारी संचालक मोरे यांसह  अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed