• Wed. Apr 30th, 2025

कधी येणार पाऊस, जूनमध्ये किती पडणार पाऊस? हवामान विभागाने वर्तवला अंदाज…

Byjantaadmin

May 26, 2023

पुणे: नैऋत्य मोसमी पाऊस अंदमान निकोबारपासून पुढे सरकण्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होऊ शकतो. मात्र यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मान्सून काळात सरासरीइतक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामानशास्त्र विभागाचे डॉ. डी. शिवानंद पै यांनी जूनसाठीचा अंदाज आणि मान्सून काळासाठीच्या दीर्घकालीन अंदाजाची माहिती शुक्रवारी दिली. देशभरात पूर्व मोसमी पाऊस चांगला पडला. देशभरात सरासरीपेक्षा १२ टक्के अधिक, तर मेमध्ये सरासरीपेक्षा ८ टक्के अधिक पाऊस पडला. ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. देशभरात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदवले गेले.

देशातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटांची नोंद झाली. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उष्णतेच्या लाटा कमी आल्या. सध्या नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारजवळ आहेत. आता त्यांच्या पुढील प्रवासासाठी अनुकुल स्थिती असल्याने मोसमी वारे ४ जूनपर्यंत केरळमध्ये दाखल होतील, असे डॉ. पै यांनी सांगितले. मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजानुसार देशभरात पाऊस सरासरीइतका म्हणजे ९६ टक्के पाऊस पडेल. मध्य आणि दक्षिण भारतात सरासरीइतका पाऊस पडेल. तर ईशान्य भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज डॉ. पै वर्तवला. तर जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर जूनमधील किमान आणि कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असल्याटे डॉ. पै यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *