मुंबई, 23 मे : सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर महाराष्ट्रातल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार याच महिन्याच होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना शिंदे गटातील मंत्र्यांची यादी तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून हिरवा कंदील येताच मंत्रिमंडळ विस्तार या महिन्यात होण्याची शक्यता आहे. या महिन्यामध्ये दोन अलर्ट प्रोटोकॉल विभागाला देण्यात आले आहेत.
मंत्रिमंडळ विस्तारातील अडचणी दूर झाल्या आहेत, जे मंत्रिपद मिळेल त्याला पूर्ण न्याय देऊ, असं शिवसेना नेते भरत गोगावले म्हणाले आहेत. तर मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत, म्हणजे होईल. माझं नाव दरवेळी चर्चेत असतं, असं सूचक विधान संजय शिरसाठ यांनी केलं आहे.
दुसरीकडे या महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचा विश्वास बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची मंत्रिमंडळ विस्तार करण्याची पूर्ण तयारी आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितलं आहे.